आदर्श गावची आदर्श वाटचाल ; श्रावणधारा महोत्सवचा शानदार शुभारंभ

Edited by: संदीप देसाई
Published on: August 05, 2023 11:26 AM
views 204  views

दोडामार्ग : केर भेकुर्ली आदर्श गावाचे कार्य आदर्शवत असे आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श तालुक्यातील सर्व गावांनी घेतल्यास गावाचा विकास दूर नाही. केर - भेकूर्ली ग्रामपंचायतने श्रावणधारा महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आयोजित करून तालुक्यातही एक वेगळा ठसा उमटविला आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी केले. 


ग्रुप ग्रामपंचायत केर - भेकुर्लीचा श्रावणधारा महोत्सव व महाग्रामसभेचे उद्घाटन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी श्री. सावंत बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म या प्राथर्ना व दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी व्यासपीठावर  मृद व जलसंधारण अधिकारी आर. टी. धोत्रे, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहा. बिडिओ  निलेश जाधव, विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, नरेंद्र गावडे, जितेंद्र तायडे ,माजी सरपंच प्रेमानंद देसाई, सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, हनुमंत गवस, ग्रामसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते.


श्री. सावंत पुढे म्हणाले की, केर गावात एखादा उपक्रम, योजना राबविण्यासाठी प्रशासन म्हणून गटविकास अधिकारी तसेच माझ्या कार्यालयामार्फत कोणतेही सहकार्य हवे असल्यास ते देण्यात येईल अशी ग्वाही अजिंक्य सावंत यांनी दिली.  जैवविविधतेच्या संगोपनातील रानभाज्या, औषधी वनस्पती,  दुर्मिळ नाणी आदींचे भरविण्यात आलेले प्रदर्शनही लक्षवेधी ठरले. 

शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात. यामध्ये वन, कृषी व महसुल विभागाच्या अनेक योजना आहेत. यांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. गाव विकासासाठी प्रत्येकाचे सहकार्य फार महत्वाचे आहे. तसेच गावात एखादी समस्या उद्भवल्यास आणि पोलीस प्रशासनाची गरज भासल्यास केव्हाही संपर्क करा. आम्ही 24 तास उपलब्ध असणार आहोत. शिवाय गावात श्रावणधारा महोत्सवासारखे स्तुत्य उपक्रम राबविणे हे गावविकासासाठी नेहमी प्रेरक ठरतात. गाव विकासासाठी ग्रामस्थांची दिसणारी धडपड ही वाखाण्याजोगी आहे असे गौरोद्गार पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी काढले. 


गाव विकासात केर गाव ठरतोय ब्रँड : निलेश जाधव 


दोडामार्ग तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले गाव म्हणजे आदर्श गाव केर आहे. अशा शेवटच्या टोकावर असणाऱ्या गावात असा श्रावणधारा महोत्सव भरविणे हे तालुक्यासाठी आदर्शवत आहे. शिवाय शासनाच्या अनेक योजना सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून कशाप्रकारे राबवाव्या व गावाचा विकास कसा घडवून आणावा हे केर गावाकडून नेहमी पहावयास मिळते.  असे उद्गार सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी काढले.