कावळ्यांच्या हल्ल्यातून अमूर ससाण्याला जीवदान

'युथ बिट्स फॉर क्लायमेट' चं रेस्क्यू
Edited by:
Published on: December 06, 2025 15:22 PM
views 210  views

मालवण : मालवणात अतिशय दुर्मिळ अशा 'अमूर ससाण्याला जीवदान देण्यात आलं. युथ बिट्स फॉर क्लायमेटने हे रेस्क्यू केलं. कावळ्यांनी या पक्ष्यावर हल्ला केला होता. 



या रेस्क्यूचा घटनाक्रम असा, मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना 'अमूर ससाणा' एका ठिकाणी बसलाय आणि कावळे त्याला बोचता आहेत असे चित्र दिसले. प्रमोद खवणेकर व जगदीश तोडणकर यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधला. लगेच भार्गव खराडे आणि अक्षय रेवंडकर हे दोघेही मत्स्य लिलावाच्या ठिकाणी पोहोचले. अमुर ससाण्याला उमेश खांबोळकर यांनी  कावळ्या पासून  सोडवत पकडले. तो थोडा घाबरलेला दिसत होता. 



अक्षयने बघताक्षणी पक्षाला ओळखले. हा अतिशय दुर्मिळ पक्षी आहे. कबुतरा पेक्षा थोडा लहान असलेला असा हा पक्षी. त्याची चोच डोळ्या सभोवतालचा भाग, पाय, पिवळसर  नारंगी रंगाचे होते. छाती कडचा भाग करडा आणि त्यावर काळ्या आडव्या पट्ट्या होत्या. शेपटी कडचा भाग थोडासा पट्ट्याचा आणि काळ्या रंगाचे पीस दिसत होते.



अक्षयने फोन करून दर्शन वेंगुर्लेकर, मेगल डिसोजा, साहिल कुबल, स्वाती पारकर यांना बोलावले. तसेच पक्षी तज्ञांनाही फोन केला. आणि वन खात्याला कळवले. 



गुगल वर माहिती शोधताना 'अमूर ससाणा' हा सायबेरिया आणि उत्तर चीनमध्ये प्रजनन करतो. हिवाळ्याच्या दरम्याने भारतात येतो. सलग पाच हजार किलोमीटर अंतर न थांबता अरबी समुद्र पार करण्याची क्षमता या छोट्या पक्षात आहे. अशी माहिती मिळत होती.  त्याला नैसर्गिक अधिवासात सोडायला हवे यावर सगळ्यांचे एकमत झाले. त्या ठिकाणी कावळ्यांची संख्या जास्त असल्यामुळे थोड्या वेगळ्या भागात त्याला सोडावे असे सर्वानुमते ठरले.

त्याप्रमाणे युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेची टीम अक्षय, स्वाती, दर्शन, साहिल,भार्गव सगळे मिळून पक्षाला घेऊन कांदळवन असलेल्या भागात गेले. दर्शन यांनी हलकेच पक्षाला सोडले. तो उडाला कांदळवनात एका फांदीवर जाऊन बसला.  तो त्याच्या दिशेने निघून गेला. युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या या कार्याचं कौतुक होतंय.