
चिपळूण : रामपूर (ता. चिपळूण) गावाच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती अमिता अशोक चव्हाण यांनी आज आमदार भास्करराव जाधव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. नव्या जबाबदारीच्या प्रारंभी त्यांनी आमदारांची भेट घेतल्याने ग्रामविकासाच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण, माजी विभागप्रमुख अनिल साळवी, सुभाष मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश कातकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रामपूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आमदार जाधव यांनी आश्वासन दिले. तसेच नव्या सरपंचांशी संवाद साधत त्यांनी ग्रामपंचायतीच्या योजनांमध्ये पारदर्शकता, लोकसहभाग आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवा, असे मार्गदर्शनही केले.
या भेटीदरम्यान गावाच्या काही विकासकामांची चर्चा झाली असून, आगामी काळात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य या प्राथमिक गरजांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे संकेत मिळाले. रामपूर ग्रामपंचायतीस नवसंजीवनी मिळावी यासाठी या भेटीमुळे एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.