
कणकवली : जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या व्यक्तिला क्रियाशील सदस्य कोण आहेत हे माहीत नसणे दुर्देवी आहे. अशा व्यक्तिची जिल्हाध्यक्षपदी राहण्याची पात्रताच नाही. या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यात पक्षाची वाताहात झाली असल्याची टिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केली आहे. पक्षाकडून सदस्य करण्यासाठी दिलेले पुस्तके उशाला घेऊन झोपणाऱ्यांना कोण सदस्य आहेत आणि कोण नाही ते काय कळणार ? पक्षाकडून माझ्याकडे देण्यात आलेली पुस्तके सदस्य करुन मी पक्षाकडे जमा केलेली आहेत. त्याची यादी ही माझ्याकडे आहे. मी स्वतः ही सदस्य असून या निवेदनासोबत माझ्या क्रियाशील २०२१ ते २०२३ सदस्यत्वाचा फॉर्म सोबत देत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य कोण आहेत, पदाधिकारी कोण आहेत हे ज्यांना माहीत नाही त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत पक्षाने कधीच उभारी घेतली नाही, एकाही ग्रामपंचायत पक्षाची सरपंच बसू शकला नाही. स्वतःची निवडून येण्याची पात्रता नसणाऱ्यांनी आता हवेत गोळीबार करणे थांबवावे. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत मनमानी कारभार करून पक्षाची हानी करण्यात आली. आम्ही पवार कुटुंबीयांची निष्ठावान आहोत हे सांगण्याची आम्हांला गरज नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही सक्रिय सदस्य व पदाधिकारी आहोत. पक्षाच्या पडत्या काळात आम्ही काम केले त्यावेळी ही मंडळी कुठे होती? आयत्या पिठावर रेगोट्या मारताना स्वार्थी राजकारण करत ज्यांनी पक्षाचे वाटोळे केले त्यांनी आमच्यावर बोलण्याची हिमत करु नये. जिल्ह्यात एकसंघ असलेल्या राष्ट्रवादीची वाताहत केवळ या एका व्यक्तीमुळे झाली आहे, अशी टीकाही श्री. नाईक यांनी केली आहे. राष्ट्रवादी पक्षात गटातटाचे राजकारण करुन खऱ्या कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारणा पासून लांब ठेवण्याचे काम या मंडळींनी केले. ज्यांना केवळ स्वतःचा स्वार्थ महत्वाचा, स्वार्थापुढे ज्याला पक्षाशी देणेघेणे नाही अशा नीतिमत्ता नसलेल्या माणसांनी आमच्या सारख्यांवरती टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणाव्या लागतील. यापुढे आमच्या बाबतीत वक्तव्य करताना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.