
ओरोस : भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची मोर्चेबांधणी कडक केली असून, ओरसमध्ये एका सक्रिय चेहऱ्याला संधी दिली आहे. ओरस ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अमित भोगले यांच्यावर भाजपने विश्वास टाकत त्यांना ओरस पंचायत समिती गणामधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भोगले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला.
दोनवेळच्या कामाची पावती: ग्रा.पं. ते पंचायत समिती प्रवास- अमित भोगले यांची राजकीय कारकीर्द ही तळागाळातील कामातून घडलेली आहे. ओरस ग्रामपंचायतीमध्ये सलग दोन वेळा सदस्य म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. या काळात त्यांनी गावातील नागरी समस्या सोडवण्याला आणि विकासकामांना प्राधान्य दिले. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांना आता पंचायत समितीच्या मोठ्या मैदानात उतरवून एक प्रकारे 'प्रमोशन' दिले आहे.
दांडगा जनसंपर्क भाजपची जमेची बाजू- ओरस गावात अमित भोगले यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा आहे. तरुणांचे संघटन आणि शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. विद्यमान सदस्य म्हणून काम करताना त्यांनी लोकांच्या मनात निर्माण केलेले स्थान, हीच भाजपसाठी या निवडणुकीत मोठी शक्ती ठरणार असल्याचे बोलले जात आहे.










