'लाईफ-लाईन' दोडामार्गवासीयांच्या सेवेत !

Edited by: संदीप देसाई
Published on: December 20, 2023 11:22 AM
views 84  views

दोडामार्ग : लोकवर्गणीतून दोडामार्गात खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे मंगळवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. लोकवर्गणीतून रुग्णवाहिका ही संकल्पना मांडणारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी दोडामार्गातील सर्वच क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या आर्थिक सहकार्यातून सर्वसामान्यांना आवश्यक असलेल्या हक्काच्या रुग्णवाहिकेची अखेर या निमित्तानं स्वप्नपूर्ती झाली असून अगदी इंधन खर्चात ही रुग्णवाहिका रुग्णालयाच्या ठिकाणी तालुकावासियांना उपलब्ध असणार आहे.

येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या अन्य रुग्णवाहिकांसोबत आणखी एक रुग्णवाहिका असावी व ही रुग्णवाहिका लोकवर्गणीतून आणलेली असावी अशी संकल्पना तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे मांडली होती. त्या संकल्पनेच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पत्रकार विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वकील, डॉक्टर, शिक्षक, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, अगदी कॉमन मॅन आदींनी या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे सुमारे 10 लाख इतकी  लोकवर्गणी जमा झाली. त्यातूनच हक्काची रुग्णवाहिका ही संकल्पना सत्यात उतरली आहे. याच रुग्णवाहिकेच लोकार्पण मंगळवारी करण्यात आल. यावेळी डॉ. एवाळे, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या समवेत गणेशप्रसाद गवस, बाबूराव धुरी, अड. सोनू गवस, विजयकुमार मराठे, चेतन चव्हाण, प्रेमानंद देसाई, शिवानंद भोसले, उदय पास्ते, दिवाकर गवस, संदीप गवस, संदीप देसाई, रंगनाथ गवस, बाबाजी देसाई, सुधीर पनवेलकर, सुनील गवस, गोपाळ गवस, महादेव देसाई, डॉ. रामदास रेडकर, अन्य रुग्णालय डॉक्टर व कर्मचारी रुंद, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या वतीनं पत्रकार संदीप देसाई यांनी या रुग्णवाहिकेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यात आले. हि जीवनदायिनी मंगळवारपासून तमाम दोडामार्गवासियांच्या सेवेत रुजू झाली आहे. दोडामार्ग रुग्णसेवा फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातुन ही रुग्णवाहिका रुग्णासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे

रुग्णवाहिका खरेदी करायची म्हटल्या बरोबर प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून संकल्पना प्रत्यक्षात आणली. एकूण १० लाख ७ हजार ४३३ रुपये जमा झाले. त्यातील रुग्णवाहिका खरेदी ८ लाख ६३ हजार १०० रुपये, रुग्णवाहिका ट्रान्सपोर्ट खर्च ५ हजार ३७० रू., रुग्णवाहिका पासिंग आणि पट्रोल खर्च २ हजार ५०० रू., आरटीओ कर ३ हजार ४०० रू., संस्था नोंदणी खर्च ५ हजार रु., इतर खर्च ४ हजार ५०० रू. असे सर्व मिळून एकूण खर्च ८ लाख ८३ हजार ८७० रुपये खर्च झाला. सध्या १ लाख २३ हजार ५६३ रुपये शिल्लक आहेत. उपस्थितांना जमा आणि खर्चाचा हिशोब देण्यात आला. लोकसभा आणि लोकवर्गणीतून रुग्णवाहिका त्यासाठी जवळपास आठ ते दहा लाखांचा खर्च होता. सारे काही अग्निदिव्य होत. मात्र या मोठ्या रकमेला आणि लोकांना अत्यंत आवश्यक असलेल्या रुग्णवाहिका संकल्पनेला समाजातील सर्व स्तरातील अगदी उद्योजक ते कॉमन मॅन या साऱ्यांनी हातभार लावला. यामध्ये साधारण २०० रुपये ते १ लाख ११ हजार रुपयांची मदत प्रत्येकाने जमेल तशी की आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी म्हणता म्हणता उभा राहिला. आणि ते स्वप्न पूर्ण झाले.

दरम्यान, लोकवर्गणीतून रुग्णवाहिका जरी उपलब्ध झाली असली तरी ही सेवा अखंडित सुरू रहावी यासाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीतच वापरण्यास देण्यात येणार आहे. शिवाय एखाद्या रुग्णालयात रुग्ण ऍडमिट असल्यावर घरी सोडताना ऍम्ब्युलन्स मिळत नाही तेव्हा ही हक्काने मिळेल. शासकीय रुग्णालयातुन खाजगी रुग्णालयात पेशंट शिफ्ट करताना शासकीय रुग्णवाहिका मिळत नाही तेव्हा ही मिळेल. त्यानंतर रुग्णवाहीका नेताना आणि आणल्यावर रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. सदर रुग्णवाहिका चालविण्यासाठी चालक स्वतः द्यावयाचा आहे त्याचे प्रमाणीत लायसन्स ही आवश्यक आहे.जेव्हा १०८ आणि १०२ सेवा असेल तेव्हा ही रुग्णवाहीका वापरता येणार नाही. रुग्णवाहिका नेताना जशी स्वच्छता असेल तशीच आणल्यावर असणे आवश्यक आहे. पेट्रोल खर्च हा रुग्ण नातेवाईक यांनी करावयाचा आहे. रुग्णवाहीका नेत असताना रुग्ण आणि रुग्णवाहीका जबाबदारी ही नेणारी व्यक्ती आणि कुटुंबीय यांची राहील.  रुग्णवाहीका नेल्यावर पुन्हा हेडकोर्टर येथे आणून ठेवणे (कितीही उशीर झाला तरी) बंधनकारक आहे. जनतेच्या पैशाचे मोल जपण्यासाठी आणि रुग्णसेवा अखंडित देण्यासाठी रुग्णवाहीका जपणे आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही सर्वानुमते आज लोकार्पण प्रसंगी ठरविण्यात आले.