...मनाची तरी बाळगा !

आमदार निधीतून दिलेली रुग्णवाहिका खातेय 'धुळ' !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 21, 2023 22:33 PM
views 358  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेला आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मे महिन्यात रूग्णवाहिक देण्यात आली. दीपक केसरकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात याचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, सध्या रूग्णवाहिका आहे, पण पुर्णवेळ ड्रायव्हर नाही अशी अवस्था या 'लाईफ लाईन'ची झालीय. लोकार्पण होऊन आज ९ महिने झालेत. पण, या ९ महिन्यात ९ वेळा सुद्धा या रूग्णवाहिकेचा वापर रूग्णसेवेसाठी झालेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना १०८ किंवा सेवाभावी संस्था, खासगी रूग्णवाहिकांवरच अवलंबून लागत आहे. नियोजनाचा अभाव व उदासीनतेमुळे ही नवीकोरी रूग्णवाहिका धुळ खात सडतेय. आजही या रूग्णवाहिकेचा हेल्पलाईन नंबर न.प. कडून जाहीर करण्यात आलेला नाही. तर गाडीवरील 18002332047 या टोल फ्री नंबरवर अॅमब्युलनसाठी संपर्क केला असता 'सध्या गाडीवर ड्रायव्हर नाहीय' असं सांगत वरिष्ठांचे नंबर दिले जातायत‌. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराबाबत तीव्र नाराजी शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.


स्थानिक आमदार निधीतून नगरपरिषदेला ही रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. पण, रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी ड्रायव्हर नसल्यानं ही रुग्णवाहिका बिनकामाची ठरत असून न.प.च्या पार्किंगमध्ये शोपीस ठरत आहे. मागील ९ महिन्यात ९ वेळा सुद्धा तिचा वापर झाला नसून प्रशासनाचा नियोजन शुन्य कारभार यातून दिसून येत आहे.


मल्टिस्पेशालिटीच भिजत घोंगड, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा अभाव यामुळे गोवा बांबुळीवर सावंतवाडीकर अवलंबून आहेत. गोरगरीबांना जिल्हा रूग्णालय व जीएमसीचाच आधार आहे. पण, तिथपर्यंत पोहचण्यासाठी लागणाऱ्या लाईफ-लाईनच भाड गोरगरीबांना परवडणार नाही. १०८ ची सेवा सगळ्यांनाच वेळेत मिळन शक्य नाही. नागरिकांच्या लाखो रुपयांचा निधीतून शहरासाठी ही रुग्णवाहिका आमदारांनी खरेदी केली. मात्र, ज्या उद्देशानं दिपक केसरकर यांनी ही रूग्णवाहिका दिली तो उद्देश काही साध्य होत नाहीय. पर्मनंट ड्रायव्हर उपलब्ध नसल्यानं ही रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध होण शक्य होत नाही. अधिकाऱ्यांचा नियोजन शुन्य कारभारामुळे २४ तास सेवा उपलब्ध असणे गरजेचं असताना ही रूग्णवाहिका सध्यस्थितीत २४ तास धुळ खातेय.


दरम्यान, रुग्णवाहीकेवर कॉन्ट्रक पध्दतीनं ड्रायव्हर भरतीसाठी दोनवेळा टेंडर काढण्यात आली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. शासनाकडून रुग्णवाहीकेवर चालक पदासाठी मंजूरी नाही. त्यामुळे ते पद भरु शकत नाही. परंतु, न.प.चे चालक वापरुन ही सेवा दिली जाते अस आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.


सिंधुदुर्गची सक्षम नसणारी आरोग्य यंत्रणा, 108 वर असणारा भर पाहता आमदार केसरकरांनी दिलेली ही रूग्णवाहिका लोकांचे जीव वाचविण्यासाठी कामी आली असती, जीवनदायीन ठरली असती. परंतु, सध्या न.प. वर असलेली प्रशासकीय राजवट व मनमानी धोरणामुळे जनतेच्या प्रश्नांच सोयर सुतक जबाबदार अधिकाऱ्यांना राहील नाहीय. त्यात हक्काचे लोकप्रतिनिधी न.प.त नसल्यानं जनसामान्य लोकांना कुणी वालीच राहीलेल नाही आहे.


 

एकीकडे, दोडामार्ग सारख्या दुर्गम तालुक्यात लोकवर्गणीतून रूग्णवाहिका खरेदी करण्यासाठी दातृत्ववान व्यक्ती, संस्था पुढाकार घेत असताना आमदार निधीतून नगरपरिषदेला दिलेली ही रूग्णवाहिका धुळ खात पडण हे दुर्दैवी, लाजीरवाण तसेच नाकर्तेपणाच आहे. त्यामुळे न.प. प्रशासनाला जनाची नाहीच, निदान मनाची तरी राहीलीय का ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. लोकांच्या पैशातून व आमदार निधीतून लोकसेवेसाठी खरेदी केलेली ही 'लाईफ-लाईन' निदान आतातरी रूग्णसेवेसाठी रस्त्यावर फिरते की न.प.च्या पार्किंगमध्येच सडते अशी भिती शहरवासीयांकडून व्यक्त होतेय.