
दोडामार्ग : दोडामार्गमधील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गरोदर मातेला कळा सुरू झाल्या. तालुक्यात पाच रुग्णवाहिका आहेत मात्र तिला पुढील उपचारासाठी गोव्यात नेण्यासाठी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. गरोदर मातेला असह्य वेदना होत असल्यामुळे ती अक्षरशः रडत होती. आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा एखाद्या मातेचा जीव घेऊ शकतो हे मात्र निश्चित. रुग्णवाहिका नसल्यामुळे तिला तात्काळ खाजगी गाडीतुन गोव्यात नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यामध्ये एकूण पाच रुग्णवाहिका आहे त्यापैकी चार रुग्णवाहिका महाविकास आघाडीचे सरकार असताना उपलब्ध करून दिल्या मात्र ह्या सर्व रुग्णवाहिकांच्या मॉनिटरिंगमध्ये समन्वय नसल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. चार चार ॲम्बुलन्स जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी औषध आणण्यासाठी जातात. रुग्णवाहिकांचे ड्रायव्हर साप्ताहिक सुट्टीत असतात. अनेक वेळा मागणी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे करून सुद्धा याची दखल न घेतल्यामुळे अनेक रुग्णाना हाल सहन करावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग व तीनही आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या रुग्णालयाच्या समन्वयासाठी समन्वयक नेमावा व त्याच्यावरती मॉनिटरची जबाबदारी द्यावी या सर्व बाबी लक्षात घेऊन ८ फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.