देवबाग समुद्र खाडी संगमावर अंबरग्रीससदृश्य पदार्थ वनविभागाच्या ताब्यात

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 08, 2023 19:36 PM
views 98  views

मालवण : देवबाग समुद्र खाडी संगमावर देवमाशाची उलटीसदृश (अंबरग्रीस) पदार्थ गणेश तांडेल या मच्छीमारास दिसून आला. वनविभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर वन अधिकारी श्रीकृष्ण परीट तातडीने देवबागला दाखल झाले. मेणासारखे पाच ते सहा गठ्ठे वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. तपासणीसाठी नागपूरला पाठवणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

गुरुवारी सकाळी मच्छिमार देवबाग संगमावर गेले असता त्यांना मेणासारखा हा चिकट पदार्थ दिसून आला. त्यानंतर मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत माहिती घेतली. स्पर्म व्हेल प्रजातीतील देवमाशाच्या उलटीला अंबरग्रीस म्हटले जाते. सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठी अंबरग्रीसचा वापर केला जातो. अंबरग्रीसचा वापर केलेली सुगंधी द्रव्ये दीर्घकाळ टीकतात. त्यामुळे अंबरग्रीसला मोठी मागणी आहे.  गेल्या दोन वर्षात अंबरग्रीस तस्करीची बरीच प्रकरणे उघडकीस आली आहेत. अंबरग्रीसला समुद्रातील तरंगते सोने म्हणतात. कारण अंबरग्रीसला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे. मात्र भारतात अंबरग्रीसच्या खरेदी-विक्रीस बंदी आहे. मात्र समुद्रकिनारी वाहून आलेले अंबरग्रीस प्रामाणिकपणे शासनाकडे जमा करणाऱ्या मच्छीमारांना गौरविले जावे अशी मागणीही पुढे येत आहे.