जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर : पालकमंत्री नितेश राणे

Edited by:
Published on: May 02, 2025 11:55 AM
views 29  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर करण्यासाठी मी पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर राहीन, अशी ठाम ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग  जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, प्रभारी  निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राणे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला संत, महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले या ऐतिहासिक ठेव्याची साक्ष देतात, संत-महंतांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी राज्याचा सांस्कृतिक ठेवा अधोरेखित केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असल्याचे सांगून ते म्हणाले की, AI कार्यप्रणाली वापरणारा राज्यातील पहिला जिल्हा, 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. याच तारखेला 1981 साली आपला सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्त्वात आला. 1 मे ही तारीख सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. याच 1 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा हा AI जिल्हा कार्यप्रणाली वापरणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. आजपासून आपण AI टेक्नॉलॉजी ही आधुनिक यंत्रणा वापरून आणखी तत्पर होणार आहोत ही सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बाब आहे. 

राज्याचा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून काम करत असताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळणार असल्याने या ऐतिहासिक आणि क्रांतीकारी निर्णयामुळे माझ्या मच्छिमार बांधवांना कृषीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीत  राज्याचे जहाज बांधणी, जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आले आहे. जहाज उद्योगाविषयी धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य

जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे. दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी विकासात्मक कामांना मी नेहमीच प्राधान्य देणार आहे. पर्यटन वाढीबरोबरच रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क सक्षम करण्यासाठी देखील अधिकचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या जिल्ह्यातही या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा परिषद आजपासून 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू' हे विशेष अभियान राबवत आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्ट मंजूरी व हप्ता वितरण लक्षांक पूर्ततेमध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिलेला आहे. जिल्ह्यातील 94 हजार विद्यार्थ्यांचे  अपार आयडी अंतर्गत आयडी काढण्यात आले असून यामध्ये देखील आपला जिल्हा प्रथमस्थानी  आहे.  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत 90 वैयक्तिक लाभार्थी तर 161 गट लाभार्थी प्रकल्पांना 18 कोटी 41 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे. सन 2024-25 वर्षामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम व देशात व्दितीय क्रमांकावर आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.  जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2025-2026 या वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेत  282 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. 

सामान्य जनतेचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी मुख्यालयात 'पालकमंत्री कक्षा'ची देखील स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत त्या 'ऑन द स्पॉट' सोडविण्यासाठी मी पालकमंत्री  म्हणून प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून एस.टी. कार्यशाळेत 90 जणांना अप्रेंटीस म्हणून नियुक्ती मिळाली आहे.  दहिबाव अन्नपूर्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटींचा तर सिंधुदुर्ग तसेच इतर किल्ल्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. वन्यप्राण्यांपासून होणारा उपद्रव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. चिपी विमानतळ विद्युतीकरणासाठी 2 कोटी 37 लाखांची तरतूद करण्यात आली असून आता विमानतळावर नाईट लँडींग देखील शक्य होणार आहे. कणकवली तहसिल कार्यालयाने 'शाळा तेथे दाखले' या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जवळपास 500 पेक्षा जास्त दाखल्यांचे वाटप केलेले आहे. 

लखपती दिदी योजनेअंतर्गत 28 हजार महिलांना लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 94 हजार पात्र अर्ज जिल्हास्तरावरून राज्यास अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 हजार 247 मुलींना लाभ देण्यात आला आहे. 

जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे  'ग्रामसंवाद' उपक्रमांतर्गत जवळपास 300 पेक्षा जास्त गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधण्यात आला आणि त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली  असून ज्येष्ठ नागरिकांनी ७०३६६ ०६०६० या क्रमांकावर संपर्क साधावा. 'ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग' या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. 

शालेय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी सावंत, अक्सा शिरगावकर,  सुरज देसाई, दर्शन पडते या राष्ट्रीय खेळाडूंनी आपल्या जिल्ह्याचं नाव देशभरात गाजवलं आहे याचा अभिमान आहे. आपल्या जिल्ह्यात शिवडाव येथे जैविक कोळसा निर्मितीबाबतचा प्रकल्प उभा केलेला असून या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील 70 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 32 पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल (पुरुष), जिल्हा पोलीस दल (महिला), होमगार्ड (पुरुष व महिला), संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक  सहभागी झाले. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत  यांनी केले.