सावंतवाडी रूग्णालयात एएलएस ॲम्ब्युलन्स दाखल !

युवा रक्तदाता संघटनेकडून आरोग्य प्रशासनाचे आभार
Edited by:
Published on: April 06, 2025 20:07 PM
views 187  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीसाठी आरोग्य प्रशासनाकडून एएलएस ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे. येथील रूग्णांसाठी या रूग्णवाहीकेची असणारी मागणी बघता ही अत्याधुनिक, व्हेंटिलेटरची सोय असणारी रुग्णवाहिका सावंतवाडीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.‌ यासाठी प्रशासनाकडे  पाठपुरावा करणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेकडून १०८ रुग्णवाहिका, जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत. 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा बांबोळी येथे रेफर केलेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. फिजीशीयन, न्यूरो, हृदयरोग तज्ञाअभावी गोव्यात पाठवल्या जाणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णाला बांबोळीला हलविताना व्हेंटिलेटर असणारी एएलएस ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यानं असुविधा निर्माण होत होती. प्राथमिक उपचार मिळण कठीण होतं. व्हेंटिलेटर असणारी १०८ ओरोस, कणकवली येथून सावंतवाडीला पाठवली जात होती‌. यात बराच अवधी जाऊन रूग्णांची परिस्थिती आणखीन गंभीर होत होती. वेळेत उपचार न झाल्यास जीवही गमावावे लागत होते. याची दखल घेत युवा रक्तदाता संघटनेकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर असणारी एएलएस ॲम्ब्युलन्स देण्यात यावी अशी मागणी आरोग्य प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी सावंतवाडीची गरज लक्षात घेऊन ही रूग्णवाहीका सुपुर्द केली आहे. १०८ चे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी ही रूग्णवाहीका सावंतवाडी रूग्णालयाच्या ताब्यात दिली आहे. यामुळे सावंतवाडीतील रूग्णांना फायदा होणार आहे. व्हेंटिलेटर, ईसीजी, सीपीआरसह इतर सुविधा या रूग्णवाहीकेत उपलब्ध आहेत. यासाठी युवा रक्तदाता संघटनेकडून जिल्हा आरोग्य प्रशासन व १०८ रुग्णवाहिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात १०८ देत असलेल्या रूग्णसेवेसाठी श्री पाटील व सहकाऱ्यांचे युवा रक्तदाता संघटनेकडून सुर्याजी यांनी विशेष कौतुक केले. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, १०८ चे विनायक पाटील, प्रथमेश प्रभू, राजू धारपवार, महेश चौगुले, धैर्यशील शिर्के आदी उपस्थित होते.