लागवडीबरोबरच औषधी वनस्पतींचे संवर्धन हा कळीचा मुद्दा : डॉ. तेंडुलकर

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 13, 2023 19:42 PM
views 82  views

सिंधुदुर्गनगरी : वनौषधींची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करण्याबाबत आतापर्यंत इतकी चालढकल झाली आहे की आता लागवडीबरोबरच या औषधी वनस्पतींचे संवर्धन हा कळीचा मुद्दा झाला आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिल तेंडुलकर यांनी आडाळी (ता. दोडामार्ग) येथे केले.

'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' ही स्वयंसेवी संस्था आणि आडाळी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे 'घुंगुरकाठी भवन'मध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आडाळीचे सरपंच पराग गावकर, 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्ष डॉ. सई लळीत उपस्थित होते. यावेळी आयुर्वेदिक तपासणी शिबिर आणि औषध वाटप असा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सई लळीत यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन प्रमुख वक्ते डॉ. तेंडुलकर यांचा सत्कार करण्यात आला.

आडाळी येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेदिक वनस्पती संशोधन केंद्राची उभारणी लवकरच होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 50 एकर जागा ताब्यात घेतली आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा या परिसरातील शेतकरी, नागरिक, कृषी व्यावसायिक, युवावर्ग यांना व्हावा, यासाठी 'औषधी वनस्पतींची लागवड' या विषयावरील हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

डॉ. तेंडुलकर पुढे म्हणाले की, आपण जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सह्याद्री परिसरात राहतो. या भागात निसर्गतःच शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती उगवून येतात. तथापि त्यांचा अद्याप व्यावसायिक म्हणावा, असा वापर झालेला नाही. अनेकवेळा औषधी वनस्पतींची लागवड या विषयावर चर्चा होते, परंतु कृती मात्र होताना दिसत नाही. सह्याद्री पट्ट्यातील जंगलतोड करून त्या ठिकाणी एकसुरी लागवड करण्याचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे या जैवविविधतेवर फार मोठा परिणाम होत आहे. तसेच यामुळे औषधी वनस्पतींच्या कित्येक प्रजाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात काम करणारे वैद्य या औषधी वनस्पती जपत असत. त्यांना त्यांचा ठावठिकाणा आणि उपयोग माहीत होते. परंतु अलीकडच्या काळात आधुनिक वैद्यकामुळे पारंपरिक औषधी वनस्पतींचा वापर कमी झाला आहे. त्यातच जंगलतोडीमुळे या वनस्पतींचे प्रमाणही कमी झाले आहे. आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कारखान्यांना अशा प्रकारचा कच्चामाल मोठ्या प्रमाणात लागतो. कृषी व्यावसायिक किंवा शेतकऱ्यांसाठी हे एक फार मोठे आर्थिक उत्पन्नाचे क्षेत्र आहे.

तथापि आपल्या जिल्ह्यात अद्याप व्यावसायिक तत्त्वावर औषधी वनस्पतींची लागवड झालेली दिसत नाही. मात्र आता अशी परिस्थिती उद्भवली आहे की या वनस्पतींची लागवड करून त्यांचा व्यावसायिक तत्त्वावर वापर करण्यापेक्षा त्यांचे संवर्धन हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीइतकेच औषधी वनस्पती वाचवणे, हे महत्त्वाचे झाले आहे. विशेष म्हणजे अनुदानाच्या विविध शासकीय योजना असूनही त्यांचा लाभ घेतला जाताना दिसत नाही. यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आणि युवकांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड केली पाहिजे. कारण या प्रकारच्या कच्च्या मालाला फार मोठी मागणी आहे, असे ते म्हणाले.

व्यावसायिक वापराबरोबरच घरगुती वापरासाठीही आयुर्वेदिक वनस्पतींचा आणि घरच्या घरीच तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांचा वापर करणे सहज शक्य आहे, असे सांगून डॉ. तेंडुलकर यांनी घरच्या घरी बनवता येणारे काढे व औषधे यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. मात्र यासाठी आपल्या घराच्या परिसरात तुळस, अडुळसा, कोरफड, माका, ब्राह्मी, जास्वंद अशा सहज उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींची छोटीशी बाग असणे आवश्यक आहे. अशी छोटीशी बाग जर प्रत्येकाने आपल्या परसात तयार केली तर सर्दी, ताप, केस गळणे यावर घरच्या घरी आपण औषध तयार करून पैसे वाचवू शकतो, हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.

डॉ. सई लळीत यांनी आपल्या परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती देऊन त्यांचे उपयोग सांगितले. आयुर्वेदिक औषधे बनवताना कच्च्या माल चांगल्या प्रतीचा मिळाला तर औषधे दर्जेदार बनतात, त्यामुळे वनौषधी लागवड खुप महत्त्वाची आहे, असे त्या म्हणाल्या.

'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी हे व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. आडाळी औद्योगिक वसाहतीमध्ये होणाऱ्या केंद्रीय आयुर्वेदिक वनस्पती संशोधन केंद्राचा फायदा स्थानिकांनाच व्हावा, यासाठी त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याच विषयावर लवकरच एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरपंच पराग गावकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याची ग्वाही दिली. दि. 28 मे रोजी आयोजित केलेल्या आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिरात ज्या रुग्णांना तपासून औषधे देण्यात आली, त्यांना लक्षणीय गुण आल्याचा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले.