'त्या' निर्णयाविरोधात ॲलोपॅथी डॉक्टरांची आक्रमक भूमिका

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 08, 2025 21:27 PM
views 59  views

सिंधुदुर्गनगरी : होमिओपॅथी डॉक्टर्सना आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देत त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आणि धोकादायक असल्याचाआरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. याच विरोधात मॅग्मो, इंडियन मेडिकल असोसिएशन, मेडिकल स्टुडंट, मार्ड हे सर्व वैद्यकीय अधिकारी  ११ जुलै रोजी वैद्यकीय सेवांचे काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे कुडाळ अध्यक्ष डॉ. संजय केसरे यांनी दिला आहे.

होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना ‘’आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देत त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आणि धोकादायक असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केला आहे. व या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, याचाच एक भाग म्हणून ११ जुलै रोजी एका दिवसीय वैद्यकीय संप केला जाणार असल्याचा इशारा आयएमएकडून देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज आयएमए संघटना कुडाळच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

आयएमए संघटना कुडाळच्यावतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. संजय केसरे, सचिव डॉ. अमोघ चुबे, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. प्रशांत पंडित, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. अजित लिमये, डॉ. हरीश परुळेकर आदी उपस्थित होते.

आयुर्वेद अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून आता होमिओपॅथी डॉक्टरांना औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा सीसीएमपी हा ब्रीज कोर्स पूर्ण केल्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र हा निर्णय सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळणारा आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्ये चुकीचे औषधोपचार, चुकीचे निदान झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आयएमएने फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित असतानाही सरकारने १५ जुलै २०२५ पासून हा आदेश जारी करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचे आयएमएचे कुडाळ चे अध्यक्ष डॉ. संजय केसरे यांनी सांगितले. राज्य सरकारने तातडीने हा निर्णय मागे न घेतल्यास आयएमएच्या सर्व शाखांच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

एमबीबीएस पूर्ण करणारे डॉक्टर पूर्णपणे वैज्ञानिक आणि पुराव्यावर आधारित उपचार पद्धती शिकतात. बीएचएमएस डॉक्टरांचे शिक्षण पूर्णपणे होमिओपॅथीवर आधारित आहे. त्यांना आधुनिक औषध, शस्त्रक्रिया किंवा आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनाचे वैज्ञानिक शिक्षण मिळत नाही. त्यामुळे जर अशा डॉक्टरला ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता मिळाली तर सामान्य रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आयएमएकडून करण्यात येत आहे.

काय आहे सीसीएमपी कोर्स

      हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीचे ज्ञान मिळावे यासाठी तो तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रमातून औषधशास्त्राचे अगदी मर्यादित प्रमाणात मूलभूत ज्ञान मिळते. हा कोर्स कोणत्याही प्रकारे ५.५ वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या समतुल्य नाही.