मालवण नगरपरिषदेच्या दिव्यांग निधीचे वाटप

दिव्यांग संघटनेने आमदार निलेश राणे यांचे मानले आभार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 04, 2024 17:55 PM
views 251  views

मालवण : दिव्यांग निधीचे वाटप करण्यात नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष दिरंगाई होतं आहे. आपण याकडे लक्ष घालावा असे निवेदन दिव्यांग संघटनेने माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांना दिले होते. त्यावेळी निलेश राणे यांनी आपण यात लक्ष घालून तुम्हाला न्याय देऊ असा शब्द दिला होता. अखेर निलेश राणे यांनी आपला शब्द पूर्ण केला असून दिव्यांग बांधवांच्या खात्यात निधीचे वितरण झाले. निधी जमा होताच दिव्यांग संघटनेने काल मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आभार मानले अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. 

नगरपालिकेच्या एकूण उत्पन्नातून बांधिल खर्च वजा जाता येणाऱ्या उत्पन्नाच्या ५ % दिव्यांग निधी वाटप केला जातो. दिव्यांगांच्या कल्याणासाठी २०१५ मध्ये शासननिर्णय करण्यात आला होता.  त्यावेळी ३ % दिव्यांग निधी वाटप केला जात होता. २०१८ मध्ये या शासन निर्णयात सुधारणा करून दिव्यांग निधी ५% करण्यात आला होता. त्यानुसार नगर पालिकेला निधी वाटप करणे बंधनकारक आहे.  अपंगत्वाच्या टक्केवारी नुसार तो निधी वितरित करण्यात येतो.   आमच्या कालावधीमध्ये 

दरवर्षी चतुर्थी किंवा दिवाळीच्या दरम्यान या निधीच वाटप केले जात होते. परंतु यावर्षी चतुर्थीला नाहीच तर दिव्यांग संघटनेने लेखी निवेदन देवूनही दिवाळीलाही या निधीच वितरण करण्यात आले नाही.  यासाठी निवडणुक आचारसहितेचा बागुलबुवा करुन निधी वाटप करण्यात आले नाही.  दिवाळीच्या दरम्यान आचारसहिता लागणार याची पूर्व कल्पना असूनही याबाबत कुठलीही आगाऊ कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत दिव्यांग बांधवाना या निधी पासून वंचित रहावे लागले. शहराच्या विकास कामात अनास्था असणाऱ्या प्रशासकाकडून दिव्यांगांच्या बाबतीतही हेळसांड करण्यात आली.  

     या दिव्यांग निधीबाबतची माहिती प्राप्त झाल्यावर या बहुसंख्य दिव्यांग बांधवाना घेवून निलेश राणे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देवून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती.  त्यावेळी निलेश राणे यांनी आचारसहिता संपताच लगेच हा निधी वितरित करण्याबाबत प्रशासनाला सूचना करुन निधी वितरित केला जाईल याबाबत दिव्यांग संघटनेला आश्वासित केले होते.  त्यानुसार आचारसहिता संपताच मालवण शहरातील १०३ दिव्यांग बांधवाना त्यांच्या खाती निधी जमा करण्यात आला आहे. निधी जमा होताच दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सत्यम पाटील आणि सचिव दत्ता कामतेकर यांनी आमदार निलेश राणे यांची त्यांच्या मालवण येथील नीलरत्न  निवासस्थानी भेट घेवून त्यांचे आभार मानले अशी माहिती माजी नगराध्यक्ष, महेश कांदळगांवकर यांनी दिली.