
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ४ नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात राजकीय डावपेच कमालीचे चढाओढ लागली आहे. भाजप–शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती होणार की तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार, याचा अंतिम फैसला आज होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी युतीबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका. त्यांच्या भूमिकेनंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना आलेला वेग पाहता युतीतील नेतेमंडळींच्या गेल्या दोन तीन दिवसांत सलग बैठका सुरू आहेत.
तथापि, युती झालीच तरी बंडखोरी अटळ असल्याचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले वातावरण सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना मात्र कार्यकर्ते "स्वबळावर लढायची तयारी" दर्शवत आहेत, कणकवलीत भाजपा कार्यालयाच्या ठिकाणी लावलेल्या फलकावरून शिंदे यांचे फोटो हटविण्यात आलेत. तर वेंगुर्ला शिवसेना कार्यालय ठिकाणी फक्त शिंदे शिवसेना नेत्यांचे बॅनर झळकत आहेत. यावरून दोन्ही पक्ष युती आणि स्वबळ या दोन्ही तयारीसाठी सज्ज असल्याचे चित्र आहे. मात्र कोकणचे जेष्ठ नेते व भाजपा खासदार यांनी युतीनेच निवडणूक लढविल्या जाव्यात अशी भूमिका घेतल्याने आता महायुतीतील सर्वच नेते व पदाधिकारी यांच्या समोर पेच निर्माण झाला असून त्या दृष्टीने जिल्ह्यात युतीच्या पदाधिकारी यांच्यात बैठका सुरु आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती करताना याच निर्णायक नेत्यांच्या भूमिका महत्वपुर्ण ठरणार आहेत. यात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर, आणि आमदार निलेश राणे यांची भूमिका युतीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
जागांबाबत भाजपचा सावंतवाडी, वेंगुर्ले नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदांवर ठाम दावा आहे, तर शिवसेना सावंतवाडी आणि मालवण नगराध्यक्षपदावर ठाम आहे.
दरम्यान, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील जागावाटपात आपला वाटा मागत असून. "योग्य सन्मान न दिल्यास ताकद दाखवू," असा इशारा या गटाने दिला आहे.
दरम्यान युतीत सध्या ‘४० : ४० : २०’ टक्केवारीचा फॉर्म्युला चर्चेत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या दरम्यान या वाटाघाटी सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त समोर येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला कसा निश्चित होईल, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. थेट निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली असून बुधवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस आहे. १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने सिंधुदुर्गच्या राजकारणात आजचा दिवस ‘निर्णायक ठरणार आहे.










