
सावंतवाडी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युती कायम राहणार का ? असा सवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना केला असता ते म्हणाले, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच ते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलतील. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला पाहिजे. महाराष्ट्र शिंदे फडणवीसांची युती आहे म्हणून खरेदी-विक्री संघात एकत्रित लढलो. एकत्र आल्याने राज्यात सत्ता आलीय, आपलं स्वप्न पूर्ण झालंय याचा विचार कार्यकर्त्यांनी देखील केला पाहिजे. आज मी याबाबत काहीही जाहीर करणार नाही. पण, मला जे काही आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना व भाजप एकत्रीत लढतील. माझं पण तेच मत आहे. याबाबत रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आम्ही दोघे मिळून युतीची अधिकृत घोषणा करू अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.