लोकशाहीचे चारही स्तंभ पोखरले जात आहेत

पत्रकारिता व्यवसाय बनलाय : गजानन नाईक
Edited by: विनायक गांवस
Published on: April 19, 2024 04:41 AM
views 107  views

सावंतवाडी : लोकशाहीचे चारही स्तंभ सध्या पोखरले जात आहेत. आजची पत्रकारिता पूर्वी सारखी राहिली नसून पत्रकारिता हा व्यवसाय बनला आहे. काही ठिकाणी संपादकानं काही लिहिलं नाही तरी चालेल. मात्र, किती जाहिराती मिळाल्या याचा हिशोब वृत्तपत्रांच्या मालकांकडे सादर करावा लागतो. निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आता ईव्हीएम मशीनवर सुद्धा संशय व्यक्त होऊ लागला आहे. लोकशाहीच्या चार स्तंभावर नियंत्रण ठेवणे हे जनतेचे कर्तव्य असून त्याबाबत आता जनतेने निर्णय घेणे गरजेचे आहे असे विधान ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांनी सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिराच्या 172 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित समारंभात केले.

श्रीराम वाचन मंदिराच्या १७२ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय ॲड. दीपक नेवगी यांचा स्मृती पुरस्कार  ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व  सन्मानचिन्ह देऊन नाईक यांचा गौरव केला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, ज्येष्ठ लेखक व इतिहासकार डॉ. जी.ए.बुवा, प्रसिद्ध व्याख्याते विवेक मेहत्रे हे उपस्थित होते.

 गजानन नाईक म्हणाले, ज्यांच्या नावानं हा पुरस्कार मला मिळाला ते माझे खास स्नेही होते. मी सुरू केलेल्या दैनिकामध्ये त्यांची 'विचारा तुम्ही' ही मालिका आम्ही सुरू केली होती. सावंतवाडीत गेली पन्नास वर्षे मी पत्रकारितेत काम करत आहे. मला मिळालेला पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारत असून या पन्नास वर्षात मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक सिंधुदुर्ग नगरीत बनविण्यासाठी मी प्रयत्न केले. आज हे स्मारक बनले याचे मला खऱ्या अर्थाने समाधान आहे असं प्रतिपादन नाईक यांनी व्यक्त केल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी. ए. बुवा यांनी केले तर संस्थेचे  कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांनी स्व. ॲड. दीपक नेवगी यांच्याबाबत माहिती देत आठवणी जागृत केल्या. दरम्यान, ज्येष्ठ व्याख्याते विवेक मेहेत्रे यांनी 'ती गेली कुठे' या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, ज्येष्ठ लेखक व इतिहासकार डॉ. जी.ए.बुवा, साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर, अँड. सुभाष पणदुरकर, सतिश लळीत, दादा मडकईकर, दत्तप्रसाद गोठसकर, बाळा बोर्डेकर, डॉ. सुमेधा नाईक, वंदना करंबेळकर आदी उपस्थित होते.