करुळ घाटमार्गे जाणाऱ्या एसटीच्या सर्व गाड्या भुईबावडामार्गे वळवा | अन्यथा आंदोलन

माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचा इशारा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 19, 2024 05:43 AM
views 465  views

वैभववाडी : रस्त्याच्या दुरुस्तीसाठी करुळ घाट पुढील ७०दिवस बंद राहणार आहे.या कालावधीत करुळ घाटातून सुरू असलेली लांब पल्ल्याची एसटी वाहतूक भुईबावडामार्गे सुरू करावी.या गाड्यांना वैभववाडीसह उंबर्डे व भुईबावडा येथे थांबा मिळावा अशी मागणी माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी केली आहे.एसटी महामंडळाने गाड्या रद्द केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही श्री रावराणे यांनी दिला आहे.

तळेरे -गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे २२जानेवारीपासून करुळ घाट वाहतूकीस बंद राहणार आहे.या घाटातून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात जाणा-या एसटीच्या अनेक फेऱ्या सुरू आहेत.घाट वाहतूकीस बंद झाल्यानंतर या फे-या रद्द होण्याची शक्यता आहे.ही वाहतूक बंद होऊ नये.ती भुईबावडा घाटातून वळविण्यात यावी.तालुक्यातील व्यापा-यासह अन्य नागरिकांना कोल्हापुरसह पश्चिम महाराष्ट्रात नेहमीच ये जा असते.त्यामुळे एसटी वाहतूक बंद झाल्यास त्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आगारातील जाणाऱ्या गाड्यां भुईबावडा मार्गे वळविण्यात याव्यात.या गाड्या रद्द करण्यात येऊ नये.या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री रावराणे यांनी दिला आहे.