जिल्ह्यात एक लाख लिटर दुग्ध संकलनाच्या पूर्ततेसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे : मनिष दळवी

Edited by:
Published on: May 24, 2024 14:05 PM
views 274  views

सिंधुदूर्ग : जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढीची चळवळ जिल्ह्यातील सर्व दुग्ध संस्थामुळे शक्य आहे. आपण करत असलेल्या कामाची दखल आता घेतली जात आहे, त्यामुळे जिल्ह्यात एक लाख लिटर दुग्ध संकलनाच्या ध्येय पूर्ततेसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा बँक सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ ) व दूध उत्पादक सह. संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त सभा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे दि. २२ मे रोजी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. दुध संस्थांना येणाऱ्या समस्या, त्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणे, जिल्ह्याबाहेरील संकरीत दुधाळ जनावरे खरेदी करीता संस्थावार कर्जप्रस्तावांचे नियोजन, गोकुळ संघामार्फत दुध संस्था व दुध उत्पादकांना राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबतचा आढावा घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी पुढे म्हणाले की, दुग्ध संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुग्ध उत्पादन कसं वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जिल्ह्यात चांगल्या दर्जाची संकरीत दुधाळ जनावरांची संख्या वाढली तरच दुध संकलनात  वाढ होणार आहे. जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लीटर संकलन होण्यासाठी दूध चळवळ एकंदरीत ज्या पद्धतीने पुढे जात आहे त्याला अधिक वेग येण्याची गरज आहे. या व्यवसायात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला आपण सामोरे जाण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेकजण आपल्या दुध चळवळीकडे वेगळ्या नजरेने बघत होते परंतू आपण आतापर्यंत केलेले प्रयत्न बघता सर्वजण आता सकारात्मक झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पत्रकारांनी नुकतेच निवजे येथे होत असलेल्या मुक्त गोठा प्रकल्पा विषयी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधला. विकास संस्था, जिल्हा बँक, भगीरथ संस्था, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन यांची मदत बँकेच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जिल्ह्यात दुग्ध व्यवसायातून एक हजार कोटीचे उत्पन्न, ५०० जनावरे आपल्या जिल्ह्यात आणणे, हजार टन चारा निर्मिती यासाठी प्रशासनाची सांगड घालून नवीन योजना राबविणे या सारखे उपक्रम भविष्यकाळात करण्यात येणार आहेत.

 या सभेस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब, संचालक सर्वश्री प्रकाश मोर्ये, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, गोकुळ चे सहा. व्यवस्थापक डॉ. कामत, सहा. व्यवस्थापक सुभाष जामदार, श्री. रणजित पाटील, डॉ. नितीन रेडकर, श्री. व्ही. टी.पटेल, श्री. राजेश गांवकर, श्री. अनिल कृष्णा शिखरे, जिल्हा बँकेचे कर्ज विभागाचे सरव्यवस्थापक श्री. के. बी. वरक तसेच जिल्ह्यातील दुग्ध संस्थांचे अध्यक्ष, सचिव बहुसंख्येने उपस्थित होते.