वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भिंतीचित्र महोत्‍सव स्पर्धेत अक्षय जाधव प्रथम..!

Edited by: दिपेश परब
Published on: February 12, 2024 14:36 PM
views 53  views

वेंगुर्ला : माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि. १३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीमध्‍ये वेंगुर्ला भिंतीचित्र महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्पर्धसाठी नगरपरिषदेमार्फत सहभागी स्पर्धकांना भिंतीचित्र काढण्यासाठी भिंती White Wash करून देण्यात आल्या होत्या . तसेच स्पर्धकांना आवश्यक ते सर्व रंग नगरपरिषदेमार्फत पुरवण्यात आले होते.  या स्पर्धेसाठी नगर परिषदेमार्फत नेमून दिलेल्या अटी शर्थी सह भिंती चित्र काढणे बंधनकारक होते. वेंगुर्ल्याची लोककला व संस्कृती,  जैवविविधता,  कलात्मक ग्राफिटी या विषयावर आधारित भींतीचित्र काढणे आवश्यक होते .

या स्पर्धेमध्ये १० पेक्षा अधिक चित्रकार सहभागी झाले होते .या स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे आहे. प्रथम क्रमांक - अक्षय जाधव, शाडू मातीपासून आकर्षक मूर्ती बनवून पारंपरिक लोककला जपणारे मूर्तिकार, कोकणातील   स्थानिक मच्छीमार, वेंगुर्ला शहराची ओळख असलेले शून्य कचरा केंद्र इ. विषयी माहिती देणारे आकर्षक चित्र याने नगरवाचनालय येथे काढले आहे .

द्वितीय क्रमांक प्रणय सावंत यांनी विविध प्राणी व पक्षी , वन्य जैव विविधता आणि  त्यांचे संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणारे भिंतीचित्र  जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नंबर २ येथे काढले आहे. तृतीय क्रमांक - आदित्य गावडे ग्रुप यांनी हिंदू संस्कृती दर्शविणारे राम मंदिर ,विठ्ठल आणि वेंगुर्ला बंदर यांची चित्रे तसेच हरवलेल्या वासुदेवाची आठवण करून देणारे चित्र इंद्रधनू पार्क ,भटवाडी येथे मुख्य रस्त्यावर काढले आहे .

उत्तेजनार्थ प्रथम रोहन हळदणकर ग्रुप यांनी वेंगुर्ला मधील विविध यात्रा, सण-उत्सव , दशावतार दर्शविणारे चित्र भटवाडी मुख्य रस्त्यावर काढले आहे. उत्तेजनार्थ द्वितीय विक्रांत सावंत ग्रुप यांनी प्लॅस्टिक टाळा व समुद्रिजीवन वाचवा असा  संदेश देणारे चित्र त्याने भटवाडी मुख्य रस्त्यावर काढले आहे . उत्तेजनार्थ तृतीय अमृत जामदार ग्रुप यांनी कलात्मक ग्राफिटी चे उत्तम चित्र त्याने कॅम्प येथे काढले आहे. 

या स्‍पर्धेमधील विजेत्‍यांना प्रथम पारितोषिक रक्‍कम रु. १००००/- , द्वितीय पारितोषिक रक्‍कम रु. ७०००/- व तृतीय पारितोषिक रक्‍कम रु. ५०००/- अशी बक्षिसे ठेवण्‍यात आलेली आहेत . तसेच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रत्येकी रक्कम रु.१०००/- देण्यात येणार आहेत.  या महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील विविध आकर्षक भिंतीचित्रांमुळे वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे.