स्पर्धा परीक्षांसाठी बालपणापासून ध्येय बाळगा : ऐश्वर्या नाईक-डुबल

Edited by: दिपेश परब
Published on: September 13, 2023 19:11 PM
views 68  views

वेंगुर्ला : स्पर्धा परीक्षा देण्याचे ध्येय बालपणापासून बाळगणे आवश्यक असून त्यादृष्टीने मेहनत अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्व विकसीत करा असे आवाहन उत्पादन शुल्क विभाग उपनिरीक्षक ऐश्वर्या नाईक-डुबल यांनी केले.

येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात जिमखाना विभागामार्फत समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.देविदास आरोलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. या कार्यक्रमात मंत्रालय कक्ष अधिकारी संग्राम डुबल यांनी विद्यार्थी कसा घडतो याची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती दिली. तर पोलिस उपअधिक्षक उदय डुबल यांनी आपल्या जीवनात आलेले अनेक प्रसंग उलगडून विद्यार्थ्यांनी शारीरिक, मानसिकदृष्ट्या कणखर बनून जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन केले. दरम्यान, ऐश्वर्या नाईक-डुबल यांची नगरपालिक मुख्याधिकारीपदी निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी प्रा.वामन गावडे, प्रा.विवेक चव्हाण, प्रा.डॉ.बी.जी.गायकवाड, डॉ.मनिषा मुजुमदार व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.जे.वाय.नाईक यांनी तर आभार प्रा.कमलेश कांबळे यांनी मानले.