
सावंतवाडी : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे शासकीय यंत्रणेसमोर कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती सावंतवाडी येथील शासकीय कर्मचाऱ्यांना “शासकीय कामकाजात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर” या विषयावर एक विशेष प्रशिक्षणकार्यक्रम घेण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी मांडली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ क्र. ४ चे उपक्रमशील व नाविन्यपूर्ण कार्यासाठी ओळखले जाणारे शिक्षक जावेद तांबोळी यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांना AI च्या विविध अंगांचा परिचय करून देण्यात आला. त्यामध्ये कार्यालयीन कामकाज सुलभ करणे, कागदपत्र तयार करणे, पत्रव्यवहार, अहवाल लेखन यामध्ये AI चा वापर कसा करता येतो याची माहिती. डेटा व्यवस्थापन व विश्लेषणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करून त्यावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता. जनसेवा अधिक प्रभावी करणेसाठी नागरिकांशी संवाद, तक्रारींवर त्वरीत कार्यवाही, माहिती त्वरित उपलब्ध करून देणे, डिजिटल साधनांचा उपयोगात शासकीय वेबसाइट्स, ॲप्स आणि चॅटबॉट्सद्वारे कामकाज अधिक सोपे करण्याच्या पद्धती.जावेद तांबोळी यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन कर्मचाऱ्यांना AI टूल्स कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे प्रशिक्षण अधिक उपयुक्त व परिणामकारक ठरले.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी सविता परब उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी कमलाकर ठाकूर यांनी उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षण देणाऱ्यांचे आभार मानले. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात नवीन तंत्रज्ञान वापरण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भविष्यातील शासकीय कामकाज अधिक जलद, पारदर्शक आणि परिणामकारक होईल, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.










