'AI सिंधुदुर्ग' ; अशी कामगिरी करणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा

Edited by:
Published on: May 01, 2025 17:24 PM
views 495  views

सिंधुदुर्ग : "सिंधुदुर्ग जिल्हा हा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा 'एआय' प्रणालीमध्ये पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

ए आय प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनात त्याचा वापर करण्याचा शुभारंभ आज करण्यात आला. राज्यात आणि देशात एआय प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनात एआय प्रणालीचा समावेश झाला आहे.

 सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ए आय युक्त जिल्हा करण्यामागील संकल्पना विषद केली.

ते म्हणाले, " राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी  जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहिर केले. त्यानंतर आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा विविध महत्त्वाच्या टप्प्यांवर पोहोचला आहे. साक्षरतेमध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे, उत्पन्नामध्ये आमचा जिल्हा पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याची महत्त्वाची ओळख आहे. आता पुढची २५ ते ५० वर्षे हा महाराष्ट्रातला नाही, तर देशातला पहिला ए आय युक्त  जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार आहे. 

 आज प्रत्येकजण गुगल आणि इंटरनेट वापरतो. त्यात  'एआय'चा वापर किती प्रभावीपणे होतो, याचा अभ्यास करावा. प्रत्येक देश आज 'एआय'च्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करण्यामध्ये एकमेकांबरोबर स्पर्धा करतात. दुबईमध्ये 'एआय'च्या माध्यमातून काम करणारं एक विशेष शहर विकसित झालं आहे. देशपातळीवर देखील  देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी विकसित देश होण्यासाठी 'एआय'चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील योग्य साधली गेली आहे. 

एकीकडे आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी  'एआय'च्या कार्यक्रमासाठी आज मुंबईत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रांमध्ये, मग कंटेंट क्रिएटर्स असतील, विविध क्रिएटर असतील, त्या माध्यमातून सगळ्या लोकांना एकत्र करून मुंबईच्या बीकेसीमध्ये तो कार्यक्रम होत आहे. आणि महाराष्ट्रातला एक जिल्हा सिंधुदुर्ग 'एआय'युक्त होतोय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

ए आय चा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या सगळ्याचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना जाते. सरकार आले आणि तेव्हापासूनच आमचा महाराष्ट्र प्रगत झाला पाहिजे, ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी प्रवास सुरू केला आणि त्यातून आम्हाला सगळ्यांना त्यांनी प्रेरणा द्यायला सुरुवात केली.

 'मार्वल' ही जी संस्था आहे,  जेव्हा आम्हाला मंत्री म्हणून आपले मंत्रालय 'एआय'मध्ये आणायचे, अशा सूचना आल्या, माझ्या मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामध्ये 'एआय'चा वापर कसा करू शकतो, याबद्दल 'मार्वल' बरोबर माझ्या बैठका सुरू झाल्या. त्या बैठकीमध्ये मी साई कृष्णन आणि प्रामुख्याने हरि पोद्दार यांना एक दिवस फोन केला, 'आपल्या विभागांतर्गत 'एआय' करू, पण एक नवीन प्रयोग करून बघूया. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला 'एआय'युक्त करायचे असेल, तर काय करायला लागेल?' त्यांनी सांगितले, 'हा विषय कधीच आमच्या समोर आलेला नाही. करू शकतो का, कसे करायचे, याचा आम्ही कधी विचार केला नाही, कारण जिल्हा पातळीवर आपल्याला तंत्रज्ञान आणायचे असेल, तर त्याच्यासमोर प्रचंड आव्हाने होती. त्यामुळेच या प्रणालीचे  नियोजन करत असताना, नेमके आम्ही काय करतो, हे आपल्या लोकांना समजले पाहिजे, 'एआय' युक्त सिंधुदुर्ग जिल्हा झाला म्हणजे काय, ते आम्हालाही सांगता आले पाहिजे, आपल्यालाही समजले पाहिजे. 'एआय' युक्त सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये काय बदल घडणार आहे, हे आपल्याला समजले पाहिजे, तुम्हालाही चार नवीन गोष्टी कळल्या पाहिजेत, म्हणूनच थोड्या संवादात्मक पद्धतीने आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे," असे  सांगितले.

यावेळी चर्चा करीत असताना नेटवर्क संबंधित प्रश्न विचारणाऱ्यांनी बरोबर प्रश्न विचारला, 'आपला दुर्गम जिल्हा आहे, डोंगराळ जिल्हा आहे, नेटवर्क आपल्यासमोर महत्त्वाची समस्या आहे, तर मग त्यावर तुम्ही उपाय कसा करणार? तिथे तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करणार?' त्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवले, 'प्रवासाला सुरुवात तरी करू. नकारात्मक विचार करून उपयोग नाही. आपल्याला जर करायचे असेल, तर इच्छाशक्ती आणि प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करायला सुरुवात केली, तर निश्चितपणे यश मिळू शकते.' असे ते म्हणाले.

पत्रकार मित्रांना कार्यक्रम लाईव्ह न करण्याची विनंती केली होती, कारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. आता जे काही तुम्ही लोकांनी पाहिले, त्याची व्हिडिओग्राफी होईल, प्रत्येक विभागात काय बदल होतोय, त्याबाबतची माहिती देणारे व्हिडिओ तयार करून माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही लोकांनी करायला पाहिजे.

जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून आज आमच्यासमोर काय आव्हाने आहेत, याचा विचार केला. आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, डॉक्टर कमी आहेत, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. सिंधुदुर्गमध्ये ४५ ते ५५ टक्के कर्मचारी प्रत्येक विभागात भरलेले आहेत. १०० टक्के उत्पादकता मिळवण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागेल. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे निर्माण झालेली दरी 'एआय'च्या माध्यमातून भरता येऊ शकते. 'एआय' कोणाच्या नोकऱ्या घेणार नाही, आम्हाला माहिती पुरवणार, डेटा पुरवणार, डेटा सगळ्यांचा एकत्र करणार. सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये कमी वेळ घालवावा, त्याला त्याचे काम पूर्ण करून तो आनंदाने परत आपल्या गावाकडे निघावा, या दृष्टिकोनातून 'एआय'चा वापर होणार आहे.

जेव्हा आम्ही प्रशासनाबरोबर बसलो, तेव्हा जिल्हा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आज आमच्यासमोर काय आव्हाने आहेत, याचा विचार केला. आमच्याकडे मॅन पॉवर किंवा कर्मचारी कमी आहेत, डॉक्टर कमी आहेत. कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. सिंधुदुर्गमध्ये सरासरी ४५ ते ५५ टक्के कर्मचारी भरलेले आहेत. १०० टक्के परिणामकारकता मिळवण्यासाठी आपल्याला कुठलातरी मार्ग शोधावा लागेल. 'एआय'च्या माध्यमातून ही दरी भरता येऊ शकते.

 'एआय' कोणाच्या नोकऱ्या घेणार नाही, माहिती पुरवणार, डेटा पुरवणार, डेटा सगळ्यांचा एकत्र करणार. सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये कमी वेळ घालवावा, त्याला त्याचे काम पूर्ण करून तो आनंदाने परत आपल्या गावाकडे निघावा, या दृष्टिकोनातून 'एआय'चा वापर होणार आहे.

आमदार म्हणून आम्ही सभा घ्यायला गेलो, तरी 'कर्मचारी नाहीत' हेच उत्तर येते. २० टक्के कर्मचारी आहेत, आम्ही कारभार कसा करायचा? कृषी अधिकाऱ्यांना विचारले, तरी तेच उत्तर. प्रशासन चालले नाही, असे राणे साहेब नेहमी म्हणतात. १०० दिवसांचा कार्यक्रम आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला, त्यामुळे शून्य प्रलंबितता असली पाहिजे, वेळेत दाखले मिळाले पाहिजेत, शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी 'शेतकरी मित्र' उभा करतोय, ज्यामुळे त्यांचे उत्पादन वाढेल आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

वनखात्याकडे कर्मचारी नाहीत, साधनसामग्री नाही, तरी 'एआय'च्या मदतीने प्राण्यांचा पॅटर्न समजून घेतला जाईल, लोकांना माहिती दिली जाईल, कर्मचारी तयार राहतील. पोलीस खात्यालाही 'एआय'ची मदत होईल, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत होईल. घरफोड्या आणि अन्य गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवता येईल.

'एआय'चा वापर करत असताना, अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोणीही गैरवापर करता कामा नये. 'एआय'मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट इंटरनेट आणि सेलफोन आल्यामुळे जशा नोकऱ्या वाढल्या, तशाच 'एआय'मुळेही वाढतील. सिंधुदुर्गमधील तरुणांनी 'एआय'च्या क्षेत्रात येणाऱ्या संधींचा अभ्यास करावा.

सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय'युक्त झाला म्हणजे काय, याचे सादरीकरण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासमोर करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा रोल मॉडेल म्हणून जगासमोर आणि राज्याच्या समोर उभा राहील, याचा मला अभिमान आहे," असे ना. नितेश राणे यांनी सांगितले.

योग्य जागी, योग्य दिवशी, योग्य माणसाचे ब्लेझर : ना. नितेश राणे

"सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात घाईत जॅकेट घातले, तेव्हा माझ्याच माणसाने सांगितले, 'साहेब, हे मोठे साहेबांचे जॅकेट आहे.' त्यामुळे  आज योग्य जागी, योग्य दिवशी, योग्य माणसाचे ब्लेझर घालून उभा असल्यामुळे मला विश्वास आहे की हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरेल ," असा विश्वास ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.