गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन सुरळीतरित्या विमानप्रवास | सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 01, 2023 18:51 PM
views 777  views

मुंबई :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची  सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि  अधिक फे-यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पाश्‌वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मंत्रायलयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री चव्हाण म्हणाले, पर्यटन जिल्हा म्हणून महत्वपूर्ण  असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील रोजगार वृद्धी तसेच स्थानिकांच्या प्रवासाच्या सोयीच्यादृष्टीने चिपी विमानतळावरील विमान प्रवास सेवा ही निश्चितच महत्वाची आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणा-या चाकरमानी,पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने देखील ही विमानप्रवास सेवा अधिक जास्त प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र सध्या या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सुरळितरित्या विमान प्रवास सेवा प्रवाश्यांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचा सबंधित अधिका-यांशी आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली असल्याचे सांगून श्री.चव्हाण म्हणाले की, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगार संधी विस्तारण्यासोबतच स्थानिक प्रवाश्यांच्या सोयीच्यादृष्टीने चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान प्रवास सेवा  सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत लवकर ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने केंद्राकडे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात पाठपुरावा केल्या जाईल,असे मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.