
रत्नागिरी : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे दि.1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषि दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . यावेळी महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली. स्व.वसंतराव नाईक यांचे कृषि क्षेत्रामधील योगदान व महाराष्ट्राला कृषि उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय व मेहनत या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या सोबतच महाविद्यालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत कृषि दिंडी व वृक्ष रोपणाचे देखील आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचेकडून वृक्ष पुजन केल्या नंतर विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय आवारात पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच विविध कृषि उपयोगी संदेश देत शिवार फेरी काढण्यात आली व महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून गेला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. कृषि शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थ्यी हे कृषि क्षेत्राचे भविष्य आहेत. कृषि दुत म्हणून त्यांनी शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या समृद्धी साठी प्रयत्न केले पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले पाहीजे असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.