अग्निवीर रेणुका राणेचा भगवती हायस्कुलच्यावतीने सन्मान !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 19, 2023 19:08 PM
views 54  views

देवगड : माझे हिंदळे गावावर खूप प्रेम आहे. तसेच या गावातील लोकांचे ही माझ्यावर खूप प्रेम आहे.अग्निविर प्रशिक्षण पूर्ण करून माझ्या हिंदळे गावात मीआल्या नंतर झालेले स्वागत मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या वडिलांचे मी पोलीस व्हावे असे स्वप्न होते ते स्वप्न मी सैन्यामध्ये सेना पोलीस विभागात भरती होत पूर्ण केले आहे. भारत मातेची सेवा हेच माझे अंतिम ध्येय आहे. अभ्यास करताना वेळापत्रक निश्चित करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. मुलगी असले तरी काहीही शक्य करू शकते अशी जिद्द मनात बाळगा. व जीवनात काही तरी वेगळं बना! असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलींमधून पहिली अग्निविर म्हणून निवड झालेल्या रेणुका विलास राणे हिने श्री भगवती हायस्कुल मुणगे येथे केले.

भारतीय सैन्यात अग्निविर म्हणून रुजू झालेल्या देवगड तालुक्यातील हिंदळे गावची सुकन्या रेणुका विलास राणे हिचा श्री भगवती हायस्कुल मुणगे येथे विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी रेणुका राणे यांचा श्री भगवती एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक आबा पुजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना रेणुका राणे म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, दिव दमण मधून १४ मुली अग्निविर म्हणून निवडल्या गेल्या व यात आपला पहिला नंबर होता. निवडी नंतर प्रशिक्षण अतिशय खडतर होते. एनडीए मध्ये जाण्याचे स्वप्न होते परंतु आवश्यक मार्क्स न मिळाल्याने आपण सायन्स पदवी शिक्षण पूर्ण केले. मोबाइलचा वापर चांगल्या कामासाठी करा. शैक्षणिक अँप चा वापर विद्यार्थ्यांनी करावा.

मुलगी आणि मुलगा हा भेदभाव न करता मुली सुद्धा आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. प्रयत्नांना कष्ठाची साथ ध्या. सैन्यात अधिकारी होण्याचा निश्चय मनोगतात व्यक्त करत या प्रशालेने सन्मान केल्या बद्दल शेवटी रेणुका राणे यांनी ऋण व्यक्त केले.

यावेळी वाद्यांच्या गजरात व औक्षण करत प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांनी रेणुका राणे यांचे स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज, अतुल राणे, प्रसाद बागवे,प्रणय महाजन, गौरी तवटे, एन जी वीरकर, हरीश महाले, सौ कुमठेकर, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रियांका कासले, सौ मिताली हिर्लेकर, झुंजार पेडणेकर, स्वप्नील कांदळगावकर, एन एल बागवे, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू, संतोष मुणगेकर, करीना राणे तसेच विध्यार्थी उपस्थित होते. प्रणय महाजन यांनी आभार मानताना रेणुका राणे यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.