नगरसेविका निलम नाईकांची आक्रमक भूमिका ; MNGLला जाग

फ्रॉड कॉल नंतर बील अदा करण्याला सुरुवात
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2026 15:38 PM
views 226  views

सावंतवाडी : नगरसेविका निलम नाईक यांनी मुख्याधिकारी यांच्यासमोर खडेबोल सुनावल्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला जाग आली आहे. सर्वोदय नगर भागात कंपनीच्या नावे झालेल्या फ्रॉड कॉल नंतर कंपनीच्या सीआरएमकडून येथील नागरिकांसह बैठक घेत बील अदा करण्याबाबतची माहिती देण्यात आली.

गॅस कंपनीकडून बील अदा करण्यासाठीच्या सुचना न दिल्या गेल्याने येथील महिला फ्रॉड कॉलला बळी पडली. लाखो रूपयांचा गंडा तिला घातला गेला. यानंतर नगरसेविका निलम नाईक यांनी मुख्याधिकारी यांच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.‌ तात्काळ यावर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गॅस कंपनीचे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अधिकारी यांनी सर्वोदय नगर येथे भेट दिली. 


यावेळी ते म्हणाले, कंपनीच्या तीन नंबर व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा नंबर हा आपला नाही. आपत्कालीन स्थिती, समस्यांसह मिटर रिडींगसाठीचे आमचे ३ नंबर आहेत. या व्यक्तीरिक्त कुठलाही नंबर कंपनीचा नसून तो फ्रॉड कॉल समजावा. त्या नंबरवर मेसेज किंवा लिंक ओपन करू नये. बील भरण्यासाठी एमएनजीएल ॲपद्वारे अथवा एक्सेकस बँकमध्ये चेक देऊन बील अदा करू शकता. अनेक विभागाच्या नावावर हे फ्रॉड कॉल येत असून त्याबाबतची तक्रार आम्ही केली आहे. मात्र, ग्राहकांनी देखील जागरूक राहत तुम्हाला दिलेल्या तीन नंबर व्यतिरिक्त इतर कोणताही नंबरशी कोणताही व्यवहार करू नये, मेसेज करू नये अथवा लिंक ओपन करू नये असही आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेविका निलम नाईक, सामाजिक कार्यकर्ते सुनिल राऊळ यांसह सर्वोदय नगर येथील नागरिक उपस्थित होते.