
कणकवली : कणकवली चोरीची सत्र पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील जेमतेम काही दिवसांसाठीच बंद असलेले दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. ही घटना रविवारी रात्री १ वा. सुमारास उघडकीस आली.
फोडलेल्या फ्लॅटमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश लक्ष्मण पथार (६५) यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. त्यांच्या फ्लॅटमधून ५ लाख २० हजार रुपये रोकड व चांदीची दोन हजार रुपयांची समई चोरीस गेली. तर अन्य फ्लॅटचे मालक हरीश पुरोहीत हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या फ्लॅटमधील चोरीस गेलेला मुद्देमाल समजू शकला नव्हता. घटनेची माहिती समजताच कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार आर. बी. नानचे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, कॉन्स्टेबल सचिन माने यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,lcb सहाय्यक पोलीस निरीक्षक घाग यांनी भेट दिली.
तत्पूर्वी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा मागमूस लागू शकला नव्हता. मागील काही महिने शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कणकवलीवासीयांमध्ये घबराट पसरली आहे.