साडेचार वर्षांनी साळगावकर चढले न. प. ची पायरी !

अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
Edited by: विनायक गांवस
Published on: August 13, 2024 10:08 AM
views 106  views

सावंतवाडी : प्रशासकीय राजवटीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात झालेलं दुर्लक्ष, नागरिकांच्या समस्या, कारभार वाढलेला भ्रष्टाचार याबाबत जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगरपरिषदेत धडक दिली. तब्बल साडेचार वर्षांनी ते पुन्हा एकदा नगरपरिषदेची पायरी चढले‌.

३ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा निवडणुकीसाठी बबन साळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ते २०१६ ला थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्याआधी २०११ ते २०१६ असा पाच वर्षांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. मात्र, २०१९ ला विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आलं. नंतरच्या न.प. पोटनिवडणुकीत ते अपक्ष उभे राहिले. यात नगराध्यक्ष संजू परब यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदा सावंतवाडी न.प.वर कमळ फुलवल‌ं. ७२० दिवसांचा कार्यकाळ त्यांनी हाकला.‌ यानंतर गेली अडीच वर्षे न.प.चा कारभार प्रशासकाच्या हाती गेलाय. नागरिकांचे प्रतिनीधी नगरसेवक आता सभागृहात नसल्यानं प्रशासनावर कुणाचा अंकुश राहीला नाही.

विविध समस्यांनी शहरवासीय त्रस्त झालेत. या संदर्भात मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पालिकेत धडक दिली. तब्बल साडेचार वर्षांनी त्यांनी नगरपरिषदेची पायरी चढली. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व शिवराम राजेंना वंदन करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये एन्ट्री केली. यावेळी खड्डेमय रस्ते, स्वच्छतेचे तिनतेरा, बोकाळलेला भ्रष्टाचार, नियोजनशून्य कारभार, डासांचा प्रादुर्भाव, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, शहरविकासात बाधा आणणाऱ्या विविध मुद्द्यांवरून त्यांनी प्रशासनाला लक्ष केल‌. उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शहारातील अवस्थेबाबत त्यांना जाब विचारला. नगरपरिषदेचा एक रूपयाही पचत नाही. तो कुठूनही बाहेर पडेल. त्यामुळे प्रामाणिक काम करा आयुष्य चांगलं होईल अशा शब्दांत अधिकाऱ्यांना फैलावर घेतल. आरोग्य व बांधकाम विभागाच्या कारभाराचा त्यांनी पंचनामा केला. नगरपरिषद हे भ्रष्टाचाराच कुरण झाल्याच्या आविर्भावात कुणी राहू नये.  हे आम्ही सहन करणार नाही असा इशारा देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.