१८ वर्षानंतर श्रावण महिन्यात आलेले पाच सोमवार योग

श्रीक्षेत्र कुणकेश्वर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज
Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 02, 2024 13:04 PM
views 235  views

देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्साहात साजरे केले जातात यावर्षीही भाविकांची श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होणार असून श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांनी भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप तसेच दर्शन रांगांची व्यवस्था केलेली आहे भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन श्रींचे दर्शन घेता येणार आहे. मात्र अभिषेक व तत्सम धार्मिक विधी सोमवारी गाभाऱ्याच्या बाहेर होतील.

यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आले असून पहिल्या सोमवारी स्थानिक आमदार माननीय श्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. दुसऱ्या श्रावणी सोमवारी विधान परिषद सदस्य माननीय आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. तिसऱ्या सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी माननीय श्री किशोर तावडे व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. तसेच इतर सोमवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री देव कुणकेश्वराची पहाटे पाच वाजता प्रथम पूजा केली जाईल यानंतर भाविकांना दर्शन खुले होईल. तरी भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 प्रत्येक सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे सेवा सादरीकरण मंदिरात होणार असून यामध्ये प्रामुख्याने संगीत भजने, दिंडी भजने व इतर सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात पार पडतील. पहिल्या श्रावण सोमवारी मुंबईतील सुप्रसिद्ध बुवा रामदास कासले, बुवा प्रमोद हरयाण, बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा विजय परब, बुवा नाईकधुरे, बुवा राऊळ, बुवा अभिषेक शिरसाट ई नामवंत बुवांची भजन सेवा कुणकेश्वर चरणी होणार आहे. श्रावण सोमवार निमित्त कुणकेश्वर मंदिरात कोणाला भजन रुपी सेवा करायची असल्यास त्या भजनी मंडळांनी आपली नोंदणी अगोदरच करावयाची आहे. 

दरवर्षी श्रावण सोमवारी कुणकेश्वर येथे होणारी वाढती गर्दी पाहता कुणकेश्वरला मिनी जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते बहुतेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी पावसाळी वन-डे पिकनिक साठी कुणकेश्वरला पसंती दर्शवितात. या कालावधीत मंदिरासमोरच्या मळ्यामध्ये शेती केली जात असल्यामुळे बहुतेक वाहने ही रस्त्यावरच पार्क केली जातात त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवते तरी येणाऱ्या भाविकांनी यावर्षी रस्त्यावरती वाहने पार्क न करता समुद्रकिनारी असलेल्या प्रशस्त पार्किंग मध्ये आपली वाहने पार्क करावीत तसेच समुद्राला उधाण असल्याकारणाने कोणीही समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात येत आहे.