ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची तात्काळ अंमलबजावणी करा

कुडाळ तालुका बार असोसिएशनची मागणी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 30, 2024 13:50 PM
views 69  views

कुडाळ : राहुरी - अहमदनगर येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या वकील दापत्याच्या निघृण हत्येचा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व कुडाळ तालुका बार असोसिएशनच्यावतीने मंगळवारी तीव्र निषेध करण्यात आला. या हत्याकांडाचा सखोल तपास होऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच वकीलांच्या संरक्षणासाठी ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी,अशी मागणी शासनाला पाठविण्यासाठी मंगळवारी कुडाळ तहसीलदार यांना कुडाळ तालुका बार असोसिएशनच्यावतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.                                    

राहुरी - अहमदनगर येथे वकील राजाराम आढाव व वकील मनिषा आढाव हे दांपत्य आपला वकिली व्यवसाय करीत होते. त्यांची २५ जानेवारी रोजी  निघृण हत्या करण्यात आली. याचे तीव्र पडसाद वकील संघटनांमध्ये उमटत आहेत. या अनुषंगाने कुडाळ तालुका बार असोसिएशनने आज कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक याना या हत्येच्या पार्श्वभूमीवर निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच या घटनेचा सिंधुदूर्ग जिल्हा व कुडाळ तालुका बार तालुका असोसिएशनने निषेधही केला. 


कुडाळ तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षा अँड राजश्री नाईक, सिंधुदूर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड विवेक मांडकुलकर, अँड राजीव बिले, अँड सुनील लोट, अँड गौरव पडते, अँड.समीर कुलकर्णी, अँड निकिता सामंत, अँड भाऊराव ( चैतन्य ) परब, अँड सिद्धेश कुबल यानी वकील सदस्यांच्या सह्याचे निवेदन तहसीलदार यांना सादर केले. निवासी नायब तहसीलदार संजय गवस यांनी स्वीकारले.

  निवेदनात म्हटले आहे, अँड राजाराम आढाव व अँड मनीषा आढाव या दांपत्याची निर्घृण हत्या करण्यात आली.या वकील दांपत्यांच्या झालेल्या निघृण हत्येचा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व कुडाळ तालुका बार असोसिएशन तीव्र निषेध करीत आहे.                               सदर हत्याकांडाचा सखोल तपास होऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्या आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी. अशी सर्व वकील सदस्यांची आग्रही मागणी आहे.

दिवसेंदिवस राज्यात वकीलांवर हल्ले करणे, धमकाविणे, त्रास देणे असे प्रकार वाढत चालले आहेत. आढाव वकील दांपत्यांच्या झालेल्या निघृण हत्येमुळे याची दाहकता अधिक प्रकर्षाने समोर आली आहे, याकडे या निवेदनात लक्ष वेधले असून 

वकीलांच्या संरक्षणासाठी  ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ लागू करणे आता अत्यावश्यक बनले आहे. तसेच सदर कायद्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु झाल्यास वकीलांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर होऊन त्यांना व्यवसाय करताना संरक्षणाची हमी मिळणारी आहे. तरी प्रस्तुत वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यासाठी आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाल कळविण्यात यावे,असे निवेदनात म्हटले आहे.