
सावंतवाडी : समाजवाद म्हणजे जातीय निष्ठा असा समज आज केला जात आहे. त्याचबरोबर धर्माच्या नावावर जे चालले आहे ते योग्य नाही. जात, समाज, रंग असा भेदभाव न करता मी भारतीय आहे हे लक्षात ठेवा. भारतीय संविधानाचा आदर करा. देश स्वतंत्र होण्यासाठी व तिरंग्यासाठी दिलेले हजारोंचे बलिदान लक्षात ठेवा आणि आपल्या भारताचे नाव जगात उज्ज्वल करा तरच खऱ्या अर्थाने आपला देश समाजवादी होईल, असे विचार माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर व्याख्यानमाला 2025 या कार्यक्रमात रमाकांत खलप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, डॉ. शरयू आसोलकर, संजय वेतुरेकर, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार, स्वातंत्र सैनिक, साप्ताहिक वैनतेयचे माजी संपादक व ज्येष्ठ समाजवादी नेते कै. जयानंद मठकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त ॲड. रमाकांत खलप यांना ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते कै. जयानंद मठकर स्मृति पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य अल्ताफ खान उत्तम वाचक पुरस्कार डॉ. प्रा. शरयू आसोलकर यांना तर प्रा. पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार संजय वेतुरेकर यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना रमाकांत खलप पुढे म्हणाले, आज न्यायाधीशाच्या घरी लाखो रुपये सापडतात हे दुर्भाग्य आहे. कोणत्या दिशेने न्यायव्यवस्था चालली आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. आज न्यायदेवता आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. हे सर्व बदलण्यासाठी भारतीय संविधानाचा आत्मा समजून घ्यावा लागेल. ' माझी भारतीय घटना ' अशा विषयांवर व्याख्याने घ्यावी लागतील. माणसे जातीवरून नाही तर त्यांच्या देश निष्ठेवरून ओळखली जातील तेव्हा खऱ्या अर्थाने देश समृद्ध होईल, असे खलप म्हणाले. कोकण भूमी ही समृद्धांची भूमी आहे. या कोकण भूमीचे गोवा मुक्तीसाठी मोठे योगदान आहे. आज जयानंद मठकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कार हे माझे भाग्य आहे. मठकर यांची परंपरा तेजस्वी आहे. त्यांना अनेक वेळा भेटण्याचा योग मला आला. हा पुरस्कार स्विकारताना जयानंद मठकर यांचे कार्य मला आठवते. त्यांच्या एवढी उंची माझी नाही असे मी नम्रतेने यावेळी सांगतो असे खलप म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले. प्रास्ताविक ॲड. संदीप निंबाळकर यांनी तर सूत्रसंचलन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. आभार रमेश बोंद्रे यांनी मानले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, डॉ. जी. ए. बुवा, मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, सौ. सई लळीत, सौ. सीमा मठकर, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, विनया बाड, कल्पना बांदेकर, बाबुराव धुरी, ॲड. सुभाष पणदूरकर, वंदना करंबेळकर, श्वेता शिरोडकर आदी उपस्थित होते.