
सावंतवाडी : मी इथला भुमिपूत्र आहे, त्यामुळे सन्मानाची आवश्यकता नव्हती. माझी ती जबाबदारी होती. आरोग्य समस्यांसाठी एकत्रित लढा देऊन चांगली सावंतवाडी, सिंधुदुर्ग बनविण्याचा प्रयत्न आपण करू, असे मत उच्च न्यायालयाचे वकील ॲड. महेश राऊळ यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित कृतज्ञता गौरव सोहळ्यात सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते.
ॲड. राऊळ पुढे म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाची सत्य परिस्थिती न्यायालयासमोर आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशापूर्वी शासनाकडून काही आदेश दिले जातात का ? डॉक्टरांच्या नेमणुका होतात का ? ही गोष्ट महत्वाची आहे. अन्यथा, न्यायालय त्याबाबतचे आदेश देईल. मी इथलाच आहे त्यामुळे सन्मानाची आवश्यकता नव्हती. सामाजिक कार्यात माझा हातभार लावत आहे. येथील जनतेचे जीव वाचावेत ही भावना त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी आणि अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विषयक जनहित याचिका विनामूल्य लढविणारे कळसुलकर शाळेचे माजी विद्यार्थी उच्च न्यायालयाचे वकील, ॲड. महेश राऊळ यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे दत्तप्रसाद गोठसकर, अभिनव फाउंडेशनचे सचिव अण्णा म्हापसेकर, किशोर चिटणीस, डॉ. प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.
कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परुळकर सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर शाळेचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने माजी विद्यार्थी ॲड. राऊळ यांचा हा गौरव करण्यात आला. सामाजिक भावनेतून विनामूल्य अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गची जनहित याचिका ते लढत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरिब नागरिकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याबद्दल कृतज्ञता म्हणून हा कृतज्ञता गौरव करण्यात आल्याचे शैलेश पै यांनी सांगितले. उपस्थितांना मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. सुभाष गोवेकर, कवी दादा मडकईकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा देसाई, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, रविंद्र स्वार, रवी जाधव, जीतू मोरजकर, अमित सुकी, प्रथमेश मुरगूड, महेश चितारी, किशोर नानिवडेकर, लक्ष्मण कदम, समिरा खलिल, हेलन निब्रे, मोहसीन मुल्ला आदींसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










