
सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपुत्र तथा जिल्ह्यातील युवा पत्रकार व पर्यावरणवादी अभ्यासक अॅड. ऋषिकेश पाटील यांनी अल्पावधीत पर्यावरण वरील केलेल्या संशोधनात्मक अभ्यासामुळे त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी (६० लाख रुपयांची चेव्हनिंग) शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे ते लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे रवाना होणार आहेत. या निवडबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे.
ऋषिकेश पाटील यांचं शालेय शिक्षण सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूल मधून घेतले, तर उच्च माध्यमिक शिक्षण श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे पुर्ण केले. त्यांनी पत्रकारिता आणि वकिलीचे शिक्षण मुंबईतल्या नॅशनल कॅालेज आणि के.सी. कॅालेज येथे पूर्ण केले. शिक्षण घेत असल्यापासून ऋषिकेश हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, पर्यावरणीय प्रश्न, क्लायमेट चेंज, सामाजिक न्याय या मुद्यांवर आधारित त्यांनी काम केले आहे.
“ क्लायमेट चेंज सध्याचा घडीला भारतासाठी सर्वात गंभीर प्रश्न असला पाहिजे परंतु त्याविषयी जागरुकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समज फार कमी राज्यकर्त्यांकडे आणि सामान्य जनतेकडे आहे. त्या अनुषंगाने मला काम करायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या विश्वविद्यालयात शिकले त्या विद्यालयात शिकण्याची संधी प्राप्त होण माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या मिळालेल्या संधीचा वापर कोकणातील पर्यावरणीय आणि त्यामुळे उद्भवणारे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी मी करणार आहे.
आपल्याकडे सह्याद्री पर्वतरांग नावाचा इकॉलॉजिकल हॉटस्पॉट आहे, त्याची काळजी तर सोडाच पण दर दिवशी लचके तोडले जात आहेत. आपल्याकडे एवढा मोठा कार्बन सिंक असताना आपण त्याच महत्त्व विसरलो आहोत. विकास कशाला म्हणायचं आणि त्यासाठी अजून किती दिवस पर्यावरणाचा बळी द्यायचा याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. क्लायमेट चेंज आपल्या देशात दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेत आहे, अशावेळी पर्यावरण हा ऐच्छिक मुद्दा न राहता त्याविषयी संघटित काम करण्याची गरज असल्याच ऋषिकेश यांनी सांगितले.
त्यांना" लिंगभाव संवेदनशीलता" विषयांवर पत्रकारितेसाठी लाडली पुरस्कार २०२२ मध्ये मिळाला. तसेच गेल्यावर्षी "उष्णतेची लाट व वातावरण बदल "या विषयावर रिपोर्टिंग करण्यासाठी त्यांना क्लायमेट ॲक्शन नेटवर्क दक्षिण आशिया रिपोर्टिंग फेलोशिप मिळाली होती. ऋषिकेश पाटील हे डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील व अभिनेते नंदकुमार पाटील यांचे सुपुत्र आहेत.देशभरातून काही मोजक्याच तरुणांची या संशोधनासाठी निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातून ऋषिकेश सह तीन तरुणांची निवड झाली आहे.