
रत्नागिरी : भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने संरक्षण खात्याच्या शिफारसीनुसार रत्नागिरी मधील ॲड. दीपक मनोहर पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लि. या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती केली आहे.
या आधी सन २०२१ ते २०२४ पर्यंत ॲड. पटवर्धन यांनी गोवा शिपायार्डचे स्वतंत्र संचालक म्हणून पदभार घेतला होता. आता तीन वर्षातील त्यांच्या कामाचा प्रभाव गोवा शिपयार्डने फेर नियुक्तीची केलेली मागणी केंद्र शासनाच्या कॅबिनेट सर्च कमिटीने केलेली छाननी या सर्व प्रक्रीयेतून पार पडत ही फेर नियुक्ती झाली आहे.
संरक्षण क्षेत्रात काम करण्याची मला प्राप्त होत असलेली ही संधी खूप मौल्यवान आहे. शिप बिल्डिंग क्षेत्रात भारत प्रचंड प्रगती करत आहे. विविध प्रकारच्या युद्ध नौका, नेव्ही कोस्ट गार्डसाठी गोवा शिपयार्ड तयार करत आहे. नियुक्तीच्या पहिल्या तीन वर्षात संचालक मंडळाने घेतलेले निर्णय, आखलेली धोरणे पुढे चालू ठेवून अधिक प्रगती शिप बिल्डींग क्षेत्रात व्हावी म्हणून आपण आपले योगदान देऊ असे ॲड. पटवर्धन म्हणाले.
ही नियुक्ती माझ्यासाठी गौरवाची असून तीन वर्षातले काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून केले. त्यामुळे फेरनियुक्ती मिळत आहे, याचा मनापासून आनंद होत आहे, असे ॲड. पटवर्धन म्हणाले.
रत्नागिरीमध्ये गोवा शिपयार्डसाठी उपयुक्त ठरेल अशी युवा मॅनपॉवर भरपूर आहे. गेल्या टर्ममध्ये येथील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची माहिती व्हावी म्हणून यशस्वी प्रयत्न केले. सीएसआर माध्यमातून १ कोटीचे दरम्यान रक्कम रत्नागिरीत आणता आली. याच सूत्रावर आधारून नव्या टर्ममध्ये प्रभावी काम करणाच्या प्रयत्न करू, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.