
सावंतवाडी : लायन्स क्लबच्या माध्यमातून 'वुई सर्व्ह' या ब्रीदवाक्यानुसार समाजातील सर्व घटकांबाबत सामाजिक बांधिलकीने कार्यरत राहून लायन्स क्लबची प्रतिमा जनतेत उंचवावी असे आवाहन लायन्स इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल डॉक्टर किरण खोराटे यांनी सावंतवाडी लायन्स क्लबच्या पदग्रहण समारंभात केले.
सावंतवाडी लायन्स क्लबचा 2025 - 26 कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा डॉक्टर किरण खोराटे, माजी प्रांतपाल ला. अजित फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नवीन अध्यक्ष म्हणून ॲड. अभिजीत पणदुरकर, सचिव म्हणून विजय चव्हाण तर कोषाध्यक्ष म्हणून प्रकाश राऊळ यांना पदाधिकार प्रदान करण्यात आले.
मावळते सेक्रेटरी अभिजीत पणदुरकर यांनी मावळत्या वर्षाचा कार्याचा आढावा घेतला. खजिनदार सुनील दळवी यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला. अध्यक्ष अमेय पै यांनी स्वागत प्रास्ताविक केले. येत्या वर्षात दोन नवीन क्लब स्थापन करण्याचे अभिवचन झोन चेअरमन अमेय पै यांनी दिले. माजी प्रांतपाल अजित फाटक यांनी नव्या टीमला शुभेच्छा देताना कोणतेही सहकार्य लागल्यास केव्हाही देण्यास उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.
डॉक्टर किरण खोराटे यांनी पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांना त्यांच्या कार्याची माहिती देऊन आपले कर्तव्य पार पाडण्याची शपथ दिली. या कार्यक्रमात गतवर्षी उत्कृष्ट कार्य केलेल्या सर्वश्री संतोष चोडणकर, गजानन नाईक, महेश पाटील, अमेय पै, संदीप कोटकर आदींचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मालवण कुडाळ कणकवली लायन्स क्लबचे पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. पाहुण्यांच्या परिचय आणि कार्यक्रमाची सूत्रसंचालन माजी रिजन चेअरमन गजानन नाईक यांनी केले. आभार प्रदर्शन नूतन सचिव विजय चव्हाण यांनी केले. यावेळी ॲड.परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, रितेश हावळ, नाथा कदम आदींसह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.