
दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग अंतर्गत ग्रामपंचायतींमधील कथित नियमबाह्य घरभाडे भत्ता प्रकरणात प्रशासनाची ढिसाळ व उदासीन भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. सासोली येथील महादेव नकुळ परब यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा हालचाल करत नसल्याने अखेर १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी कोकण भवन, नवी मुंबई येथे उपोषणाचा इशारा दिला असून ते त्यावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्री. परब यांच्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत पंचायत समिती दोडामार्ग अंतर्गत अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसतानाही त्यांना घरभाडे भत्ता देण्यात आला. हा प्रकार शासन नियमांचा सरळ भंग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात संबंधितांकडून भत्त्याची वसुली करणे, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागापासून ते कोकण विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत घेण्यात आली. ग्रामविकास विभागाने स्पष्ट निर्देश देत नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पुढे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी, दोडामार्ग यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.
मात्र, इतक्या उच्चस्तरीय आदेशांनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनातील दिरंगाई, जबाबदारी टाळण्याची वृत्ती आणि फक्त कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार पत्रव्यवहार होऊनही फाइल्सच पुढे सरकत नाहीत, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
श्री. परब यांनी २५ एप्रिल २०२६ पर्यंत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता ते १ मे रोजी कोकण भवन येथे उपोषणाला बसणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने पुन्हा एकदा तातडीने चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले असले तरी, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.












