सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक प्रयत्न करावेत : पालक सचिव वल्सा नायर- सिंह

‘१०० दिवस कृती आराखड्या’अंतर्गत विविध विभागांचा आढावा
Edited by:
Published on: February 14, 2025 18:02 PM
views 234  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनावर आधारीत अधिकाधिक उद्योग व्यवसाय या जिल्ह्यात उभे राहणे आवश्यक आहे.  विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी देखील विकासाचा दृष्टिकोन असलेले आहेत. सर्वसामान्याचे जीवन सुकर होण्यासह त्यांच्या समस्यांवर सहजासहजी तोडगा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अपर मुख्य सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक सचिव वल्सा नायर- सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे १०० दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. १०० दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण नागरिकस्नेही करणे, सुकर जीवनमान, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण, कार्यालयीन सोयी व सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपवरसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

श्रीमती नायर म्हणाल्या, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. शिवाय प्रशासनाला शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करावे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, अधिकाऱ्यांनी शासनाच्या महत्वाच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात असेही त्या म्हणाल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरडोई उत्पन्नात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी विकासात्क दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज आहे, असे सांगून श्रीमती नायर म्हणाल्या, जिल्ह्याला पर्यटनाची पार्श्वभूमी असल्याने पर्यटनावर आधारीत उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. जेणेकरुन पर्यटनवाढीसह रोजगारात देखील वाढ होईल. जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठी विविध उद्योग सुरू होणे आवश्यक आहे.  या जिल्ह्यात सुक्ष्म व लघु उद्योगाला पोषक वातावरण  असल्याने या दिशेने देखील प्रयत्न व्हावेत.

त्या पुढे म्हणाल्या, येथे पर्यटनक्षेत्रांचा चांगला विकास झालेला आहे. तथापि, जिल्ह्यात आलेला पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेट देत तीन-चार दिवस जिल्ह्यातच कसा राहील यादृष्टीने सर्वंकष पर्यटन विकास आराखडा करावा, जेणेकरुन महसूलवृद्धीसह स्थानिकांना रोजगारही मिळेल. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी विविध विभागांच्यावतीने चाललेल्या कामकाजाविषयी माहिती दिली. सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत विविध विभागांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याने कामातील समस्या तातडीने सोडविता येऊन कामे मार्गी लागत असल्याचे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी जिल्हा परीषदेच्या अद्यावत संकेतस्थळाविषयी माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी कशा प्रकारे सोडविल्या, कार्यालयीन स्वच्छता, सोयी सुविधा याविषयी सविस्तर माहिती दिली.