
वैभववाडी : वैभववाडी शहर अनेक समस्यांनी ग्रासले आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शहरात जागोजागी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सुविधांकडे लक्ष द्या अशा आशयाचे निवेदन उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की नगरपंचायतीवर आली आहे.शहराच्या दोनही बाजुला नद्या आहेत परंतु शहराला पाणी नाही अशी अवस्था या शहराची झाली आहे.नियोजनाअभावी ही स्थिती उद्भवली आहे.नगरपंचायती अस्तित्वात आल्यानंतर ६ वर्षाचा कालावधी लोटला असुन या कालावधीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकलेली नाही.दोन वर्षापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,पालकमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वैभववाडी शहरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ७ कोटीचा निधी मंजुर केला होता.परंतु नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे हा निधी खर्च होऊ शकला नाही.पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर समस्यांनी शहराला घेरले आहे.शहरात जागोजागी गटारे तुंबली आहेत.अनेक ठिकाणी कचरा साचला आहे.त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.स्ट्रीटलाईट सुध्दा अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहे.त्यामुळे शहरातील पायाभुत सुविधांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी श्री.लोके यांनी केली आहे.