
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांकडून मिळणाऱ्या नामनिर्देशनपत्रांची स्वीकृती संगणक प्रणालीद्वारे (online) तसेच पारंपरिक पद्धतीने (offline) केली जात आहे.
मात्र काही उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रक्रिया स्वयंचलित संगणक प्रणालीमध्ये स्वीकारताना वेळ लागणे, नेटवर्क समस्यांमुळे त्रुटी निर्माण होणे तसेच सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन मर्यादा अशा कारणांमुळे अडचणी उद्भवू नयेत यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
त्याअनुषंगाने दिनांक १४/११/२०२५ ते १६/११/२०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत, तसेच १६ नोव्हेंबर हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस (रविवार) असतानाही, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांची ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे नामनिर्देशनपत्रांची तपासणी करण्याची मुभा दिली आहे.
या कालावधीत दाखल झालेली कागदपत्रे व त्यासंबंधीचे निर्णय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या प्राधिकाऱ्यांकडे सादर करू शकणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या या आदेशानुसार, सर्व जिल्हाधिकार्यांना निवडणूक प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत म्हणून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा वेग आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.










