मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आडाळी सरपंचाच नवं अभियान

वर्षभराच्या मानधनासह ५० हजारांचे पराग गावकर देणार योगदान
Edited by: संदीप देसाई
Published on: June 17, 2023 19:43 PM
views 205  views

दोडामार्ग : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन दिवस उलटले, आंदोलन छेडले मात्र तरीही शाळेसाठी नियमित शिक्षकांचा प्रश्न सुटत नसल्याने अखेर प्राथमिक शाळेत शिक्षक नियुक्तीसाठी 'सामाजिक कृतज्ञता निधी' उभारण्याचा निर्णय आडाळी गावचे सरपंच पराग गांवकर व पालकांनी घेतला आहे. ' एक दिवस शिक्षणासाठी ' या अभियानाद्वारे आपली एक दिवसाची कमाई शिक्षकांच्या मानधनासाठी द्यायची, असं हे अभियान असून त्याची सुरवात स्वतःपासून करायची असा निर्णय घेऊन पालकांनीच शिक्षक प्रश्नावर तोडगा काढला आहे. दरम्यान, सरपंच श्री. गांवकर यांनी आपले वर्षभराचे सरपंच मानधनासह पन्नास हजाराची रक्कम सामाजिक कृतज्ञता निधित जमा करणार असल्याचे सांगितले आहे.


१८ विद्यार्थी असलेल्या शाळेत केळव एकच शिक्षक असल्याने आडाळीतील पालकांनी मुलांना शाळेत नं पाठविण्याचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरु होते. त्याची दखल घेऊन अखेर गट साधन केंद्रातील विषयतज्ञ सोमवार ( ता. 19) पासून शाळेत शिक्षक म्हणून रुजू होईल असे गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ यांनी सरपंच श्री. गांवकर यांना भ्रमणध्वनीद्वारे सांगितले.

मात्र जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शासन स्तरावर औदासीन्य असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज श्री. गांवकर यांनी पालकांची तातडीची बैठक घेतली. यावेळी शिक्षकांचा प्रश्न, इंग्रजी खाजगी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांमधील दर्जाबाबत असलेल्या पालकांच्या तक्रारी, त्यामुळे पालकांचा मराठी शाळेबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन, शासनाचे उदासीन धोरण याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर श्री. गांवकर यांनी ग्रामस्तरावर शाळेत खाजगी शिक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव पालकांसमोर मांडला. शिक्षकांना मानधन देण्यासाठी निधीची गरज आहे. त्यासाठी आपण पालक म्हणून पहिल्यांदा योगदान द्यावे. त्यानंतर शिक्षणप्रेमी नागरिकांना मदतीचे आवाहन करून सामाजिक कृतज्ञता निधी उभरुया. त्याद्वारे चांगले मानधन देऊन शिक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या 'निधी' साठी  श्री. गांवकर यांनी सरपंच पदाचे वर्षभराच्या मानधनसह पन्नास हजार देणार असे सांगत पालकांनीही वर्षभरातील कमाईपैकी एका दिवसाची कमाई निधीत जमा करण्याचा प्रस्ताव ठेवला. पालकांनी एकमुखाने त्याला मान्यता दिली.  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सानिका गांवकर, अमोल परब यांनीही वर्षभराचा बैठकभत्ता निधीत जमा करणार असल्याचे सांगितले. 

आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपणच पुढाकार घेवून सोई सुविधासाठी शासनाकडे पाठपुरावा करत राहूया. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सोमवारपासून शाळा पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पालक सिद्धेश गांवकर, संदीप गांवकर, मेघा गांवकर, उर्मिला गांवकर, स्मिता परब, प्राप्ती गवस, अश्विनी परब, उत्कर्षां बोर्डेकर, तृपीता गांवकर आदी उपस्थित होते. 

म्हणूनच अभियान...

शिक्षण व आरोग्य हे सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. मात्र शासन या प्रश्नांकडे गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे ग्रामस्थ कायम अस्वस्थ असतात. शिक्षण हा मुलांचा हक्क आहे. तो मिळविण्यासाठी संघर्ष तर करावाचा लागेल. पण या प्रश्नाबाबत जनतेनेही संवेदनशील व्हावं लागेल. म्हणून कायमस्वरूपी शिक्षक मिळण्याची वाट बघत न थांबता निधी उभारून स्वतःच शिक्षक नियुक्तीचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे श्री. पराग गांवकर यांनी सांगितले.