
चिपळूण : चिपळूण शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रांत कार्यालय व चिपळूण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “प्लास्टिक मुक्त चिपळूण शहर अभियान २०२५” शुक्रवार, दिनांक २० जून २०२५ रोजी राबविण्यात येणार आहे. या अभियानात चिपळूण नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर अभिनेते ओंकार भोजने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या अभियानाच्या निमित्ताने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत शहरातील अकरा ठिकाणी एकाचवेळी प्लास्टिक कचरा संकलन मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता गांधारेश्वर तिठा परिसरात वृक्षारोपण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता अभिनेते ओंकार भोजने स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत घंटागाडीवरून प्रत्यक्ष कचरा संकलनात सहभागी होणार आहेत.
सकाळी अकरा वाजता चिंचनाका ते नाथ पै चौक या मार्गावर एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदीबाबत व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता चिंचनाका व जुन्या एस.टी. स्टँड बाजारपेठ येथे कापडी पिशव्या वेंडिंग मशीनचा अनावरण सोहळा होणार आहे. दुपारी बारा वाजता चिपळूण नगर परिषद हद्दीत ‘प्लास्टिक निषिद्ध क्षेत्र’ फलकाचे अनावरण करण्यात येईल.
या अभियानाच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्त शहर घडविण्यासाठी जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून नागरिकांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांताधिकारी आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.