परप्रांतीय नौकेवर कारवाई ; नौका जप्त, मासळीचा लिलाव

Edited by:
Published on: April 22, 2025 15:51 PM
views 268  views

मालवण : महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात, करण्यात आली.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, श्रीमती तेजस्विता भ. करंगुटकर या नियमित गस्त घालत असताना, कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली "श्रीम. वेदवती स. पुथरण, रा. मारीकंबा नगर थोत्तम, उडपी, राज्य - कर्नाटक" यांची "श्री महालक्ष्मी ३" (नोंदणी क्र. IND-KA-2-MM-6268) ही नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मुणगेसमोर अनधिकृतरीत्या मासेमारी करताना आढळून आली.

या नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे एकूण सात सदस्य होते. नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. यावर आढळलेली अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीची मासळी लिलावासाठी ठेवण्यात आली असून त्याची कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी श्री. अमित हरमलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण/सर्जेकोट तसेच सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अंमलबजावणी अधिकारी श्रीमती तेजस्विता भ. करंगुटकर यांनी सदर घटनेबाबत प्रतिवेदन दाखल केले असून, संबंधित नौकेविषयीची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.