दाभोळ समुद्रात एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या बोटीवर कारवाई

Edited by:
Published on: April 25, 2025 12:07 PM
views 162  views

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून आहे.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर अनधिकृत मासेमारी आणि एलईडी मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मत्स्यविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच दि. 25/4/2025 रोजी रात्री 00.45 च्या सुमारास बुरोंडी समोर 11.5 सागरी माइल्स मधे मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) हे गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नझीम अली जांभारकर, (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी ) यांची नौका- साबीर, नों. क्र. IND-MH-4-MM-493 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात बुरोंडी समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटचा वापर करताना पकडण्यात आली. या नौकेवर नौका तांडेलसह 2 खलाशी होते.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत एल.ई. डी. नौकेवर कारवाई करून सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत. 

सदर कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेस्कर व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, सागरी सुरक्षा रक्षक व गस्ती नौका रामभद्रा वरील कर्मचारी यांचे सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.