आंबोलीतील 'त्या' अनधिकृत बांधकामावर कारवाईस सुरूवात..?

Edited by: भरत केसरकर
Published on: March 05, 2024 05:23 AM
views 467  views

सावंतवाडी : आंबोलीतील "त्या" अनधिकृत बांधकामावर अखेर कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे. वन व महसूलने ही संयुक्त कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

 आंबोली येथील हिरण्यकेशी सर्वे नंबर २३ परिसरात उभारण्यात आलेल्या "त्या" २३ ते २७ बेकायदा बंगल्यांवर तसेच बांधकामावर अखेर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळपासून बांधण्यात आलेले बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम सुरू झाले आहे. वनविभाग आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान या ठिकाणी आंदोलन करत असलेल्या स्थानिक ग्रामस्थांना बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात येत असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

या ठिकाणी या कारवाईचे शूटिंग आणि फोटो काढण्यासाठी जात असलेल्या स्थानिक पत्रकारांना सुद्धा बांधकाम तोडण्यात  येत असलेल्या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. सर्व बांधकाम तोडून झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती उपलब्ध करण्यात येईल आणी फोटोही देण्यात येतील. असे संबंधित प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.