आंबोलीत बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई

Edited by: विनायक गांवस
Published on: May 06, 2024 08:54 AM
views 351  views

सावंतवाडी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा येथून आंबोली मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअपवर कारवाई करत ६ लाख ११ हजार ६०० रुपयांच्या अवैध दारू सह पाच लाख रुपयांचा टेम्पो जप्त करण्यात आला. आंबोली चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी प्रकाश बाजीराव मारकड (वय -३३ वर्षे, रा. दत्तनगर कर्नाळा रोड सांगली तालुका-मिरज जिल्हा- सांगली ) व अशोक तुकाराम गडदे ( वय ३६ वर्षे, रा. पंचशील नगर सांगली तालुका-मिरज, जिल्हा-सांगली ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद आंबोली दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार दीपक शिंदे यांनी नोंदवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा येथून आंबोली मार्गे अवैध दारू वाहतूक होत असल्याच्या संशयावरून आंबोलीचे पोस्टवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याच तपासणी दरम्यान गोवा येथून आंबोली मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअपची ( एम एच – ५० -८२०८ ) तपासणी केली असता त्यात अवैध दारू आढळून आली. यात मॅकडोनाल्ड लेबलच्या १८० मिली मापाच्या गोवा बनावटीच्या दारूने भरलेला प्रत्येकी ४८ काचेच्या सीलबंद बाटल्याप्रमाणे एकूण ४० पुठ्ठ्याचे बॉक्स आढळले.

त्यामध्ये एकूण १९२ काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली ची किंमत २५५ रुपये प्रमाणे तसेच इम्पेरियल ब्ल्यू लेबलच्या गोवा बनावटीच्या १८० मिलि मापाच्या दारूने भरलेल्या प्रत्येकी ४८ काचेच्या सीलबंद बाटल्याप्रमाणे एकूण ४ फुटाचे बॉक्स आहेत. त्यामध्ये एकूण १९२ काचेच्या बाटल्या असून प्रत्येक बाटली ची किंमत २५५ प्रमाणे मिळून आल्या तर याच प्रकारे रॉयल स्टॅग चे देखील एका बॉक्स मधील ४८ जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.न. ८५/२०२४ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( अ)( ई),८१,८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक नारनवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे,अभिजीत कांबळे, राजेश नाईक यांनी केली.