चोर सोडून संन्याशाला फाशी ?

प्रांताधिकारी जाणार का मुळाशी ?
Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2025 15:24 PM
views 330  views

'त्या' कर्मचाऱ्यांना कारवाईच पत्र !

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन व साफसफाईचे काम करणाऱ्या 'साईराज बेरोजगार सेवा सहकारी संस्थे'ने कंत्राटी सफाई कामगारांना मोठा धक्का दिला आहे. संप पुकारल्यामुळे आणि कामात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे संस्थेने १५ सप्टेंबर २०२५ पासून कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब दिनकर घाडगे यांनी हे पत्र कर्मचाऱ्यांना दिले आहे. यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी ? अशीच काहीशी अवस्था पहायला मिळत असून प्रशासन म्हणून कारभार हाकणारे प्रांताधिकारी कोणती भुमिका घेणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

संस्थेचे अध्यक्ष श्री घाडगे, यांनी या कंत्राटी कामगारांना दिलेल्या पत्रानुसार, संस्थेने १६ मे २०२५ ते १५ मे २०२६ या कालावधीसाठी रस्ते, नाले, गटारे आणि खुल्या जागांची साफसफाई करण्यासाठी कामगारांना नियुक्त केले होते. मात्र, संस्थेच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास त्यांना कामावरून काढण्याचा अधिकार संस्थेला आहे, असे स्पष्ट केले आहे. कामगारांनी १९ ऑगस्ट, २४ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट रोजी कोणतेही ठोस कारण न देता काम बंद केले होते. तसेच, १५ सप्टेंबर २०२५ पासून त्यांनी पुन्हा बेमुदत संप पुकारला. सणासुदीच्या काळात कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्यामुळे आणि नगरपरिषद व संस्थेला वेठीस धरले जात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या संपामुळे आणि कामगारांच्या निष्काळजीपणामुळे नगरपरिषदेने संस्थेवर दंडात्मक कारवाई केली आहे किंवा करणारण आहे, असेही निवेदनात नमूद आहे. संस्थेला होणारा आर्थिक भुर्दंड संबंधित कामगारांच्या सप्टेंबर २०२५ च्या वेतनातून कपात केला जाईल. या संदर्भात कोणत्याही प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगारांच्या जागी नवीन कामगारांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही या निवेदनात सांगण्यात आले आहे. 

ऐन गणेशोत्सवात शहराची घाण साफ करणाऱ्या सफाई मित्रांना पगार दिला गेला नव्हता. यावेळी प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठक झाली होती. कर्मचारी सांगत असलेला पगार व न.प. अधिकारी ठेकेदाराला कर्मचाऱ्यांसाठी देत असलेला पगार यात तफावत दिसत होती. पगार पावती अथवा करार आपल्याला दिला गेला नसल्याचे म्हणणं त्या कर्मचाऱ्यांच होत. यात अखेर प्रांताधिकारी यांनी तोडगा काढत पगार जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या आदेशालाही न.प. अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा प्रकार घडला होता. गणेशोत्सवानंतर या कर्मचाऱ्यांचा पगार झाला. यातच पीएफचे लाखो रूपये ठेकेदाराने हडपल्याचा आरोप करत त्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर त्यांना कारवाई बाबतची पत्र आली आहेत. जवळपास २० जणांना ही पत्र आल्याचे समजत आहे. 

दरम्यान, न.प. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संमतीनेच हा ''व्हाईट कॉलर भ्रष्टाचार'' झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.‌ यात आता संबंधित कंपनीने या हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामुळे हे प्रकरण अधिकच तापणार आहे. तर चार वर्षांचा पीएफ कर्मचाऱ्यांना न देणाऱ्या ठेकेदाराला बील अदा करताना न.प.चे संबंधित अधिकारी करत काय होते ? हा देखील प्रश्न यामुळे उद्भवला असून बहुतांशकरून प्रशासकीय काळात झालेल्या या घोटाळ्याच्या मुळाशी आता प्रशासक तथा प्रांताधिकारी जाणार का ? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

याबाबत, न.प. प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांना विचारणा केली असता, साईराज बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच कोणत्याही प्रकारच पत्र माझ्यापर्यंत आलेलं नाही. मुख्याधिकारी यांना विचारून व माहिती घेऊन मी बोलेन असं त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, सध्या तरी चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच काहीशी अवस्था या प्रकरणात दिसत असून प्रांताधिकारी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.