विनयभंग प्रकरणी निर्दोष मुक्तता !

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 23, 2024 14:02 PM
views 267  views

कणकवली : व्हॉटसअप, इन्स्टाग्रामवर मैत्री करून अल्पवयीन असल्याचे माहित असूनही फोटो व व्हिडीओ काढून विनयभंग केल्याप्रकरणी नडगिवे धुरीभाटलेवाडी येथील ऋषभ रविंद्रनाथ बांदिवडेकर याची प्रधान जिल्हा व सत्र तथा विशेष न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांनी काम पाहिले.

लॉकडाऊन कालावधीत तालुक्यात आलेल्या व नंतर येथेच असलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून नंतर व्हॉटसअप, इन्स्टाग्राम व मित्रांच्या माध्यमातून सातत्याने संपर्क ठेऊन आरोपीने मैत्री केली. त्यानंतर तीचे फाटो व व्हिडीओ घेतले व तीला फोटो व व्हिडीओ काढून पाठविण्यासाठी धमकी दिली. याप्रकरणाचा पिडीतेच्या कुटुंबियांना संशय येताच त्यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ ब, ३५४ अ, ३५४ ड, ५०४, ५०६ तसेच अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा कलम ८, ११, १२, १४, १५ अन्वये व माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ ई व ६७ बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला अटक झाली होती.

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, विश्वासार्ह पुरावा न आल्याने आरोपीची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.