आचरा संगम ते देवबाग संगम 'सागरी यात्रा'

Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 23, 2023 12:54 PM
views 109  views

सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे. त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलीकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी धूप होऊन किनारपट्टा विद्रूप होत आहे. वाळू वाहून जात आहे. त्यामुळे बीच नष्ट होत आहेत. या सर्व गोष्टींसाठी आचरा संगम ते देवबाग संगम या किनारपट्टीतील गावामध्ये दिनांक २७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सागरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये किनारपट्टीच्या नागरिकांशी चर्चा करून प्रत्येक गावाच्या समस्यांचा अभ्यास करून विकासात्मक धोरण ठरविण्यात येणार आहे. 

किनारपट्टीचे संरक्षण करण्यामध्ये बरेच वर्ष दुर्लक्ष झालेला आहे. तरी आता योग्य नियोजन करून ग्रोयांस बंधारे आणि धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व गावांचा एक मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये पर्यटनासाठी आणि मच्छिमारांसाठी जेटी बांधण्याची गरज आहे. सर्व खाड्यांमध्ये प्रचंड गाळ साठलेला आहे. तो काढून प्रवासी आणि मच्छिमार बोटींना खाड्या खुल्या केल्या पाहिजेत. मच्छिमारांचा मासेमारी हा प्रमुख उद्योग आहे. मासेमारीसाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. प्रत्येक गावामध्ये मासेमारी आणि पर्यटक बंदर बनविण्यात यावी. मच्छिमारांसाठी पूर्वीसारखी मदत होण्यासाठी विशेष मच्छिमार पॅकेज निर्माण करण्यात यावे. मागे आम्ही एक पॅकेज निर्माण केले होते. तसे मुलभूत गोष्टी निर्माण करण्यासाठी हे पॅकेज असावे. 

माधवराव शिंदे पर्यटन मंत्री असताना १९९२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर करण्यात आला. अनेक लोकांनी न्याहरी व निवास योजना सुरु केली. या घरांसाठी पर्यटक आणण्यासाठी गरज आहे. त्यासाठी MTDC ने पर्यटक केंद्रांना स्टार दर्जा देणे गरजेचे आहे. जागोजागी पर्यटन केंद्र उभारणे, सार्वजनिक ठिकाणी माहितीचे फलक लावणे, स्वच्छता गृह उभारणे, जलक्रीडा सुविधा आणि साहसी खेळांच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. 

मच्छिमारांचे जीवन, उपजीविका आणि अन्न सुरक्षा शाश्वत होण्यासाठी त्यांच्या विकासाचे धोरण ठरवून त्यांची अंमलबजावणी करणे  गरजेचे आहे. चक्रीवादळे, सीआरझेड सिमांकन, सागरी बंदर प्रकल्प, मासेमारीचा कालावधी अशा अनेक विषयांवर मच्छिमारांशी चर्चा करून विकासाचे धोरण ठरवण्यात येणार आहे. हि सागरी यात्रा पक्षविरहित असून मच्छिमार समाज आणि पर्यटन व्यवसाय असणाऱ्या जनतेला समृद्ध आणि आनंदी बनविण्यासाठी या सागरी यात्रेत सर्व लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.