
वैभववाडी : आचिर्णे धनगरवाडी येथे जाणारा रस्ता डांबरीकरण व्हावा या मागणीसाठी येथील ग्रामस्थ (ता.९फेब्रु) रोजी आचिर्णे काज-याचे ठिकाण येथे उपोषण करणार आहेत.याबाबबत त्यांनी आज (ता.२) तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यातील आचिर्णे या गावातील धनगरवाडीकडे जाण्यासाठी रस्ता नाही.मुख्य गावापासून या वाडीचे अंतर ५किमी एवढे आहे.यापैकी सुमारे ३किमी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.उर्वरीत २किमी रस्त्याचे काम गेली ५वर्षे प्रलंबित आहे.याबाबत येथील ग्रामस्थांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला.परंतू हे काम अद्याप झाले नाही.यामुळे याभागात राहणाऱ्या ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय होत आहे.
रस्ता नसल्याने औषधोपचारासाठी वयोवृद्ध व गरोदर मातांना डोलीतून कसरत करून न्याव लागत आहे.गेल्यावर्षी या रस्त्यासाठी १०लाखांचा निधी मंजूर झाला होता.मात्र याचे काम अद्याप सुरू झाले नाही.सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अन्यथा येथील काज-याचे ठिकाण येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.